विद्यार्थ्यांना २० रूपयांत १ लाखाचा विमा; काय आहे राज्य सरकारची योजना?
महाराष्ट्र सरकारने शासकीय, अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी (student) ‘वैद्यकीय, अपघात विमा संरक्षण योजना’ जाहीर केली आहे. सोमवारी (दि.१७) जारी केलेल्या आदेशानुसार, पदवीधर विद्यार्थी आणि पालकांना आता २० रुपये ते ४२२ रुपयांपर्यंत प्रीमियम भरून वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील सुमारे ३० लाख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकतो.
सर्वसामान्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीत विमा संरक्षण हा सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे विम्याबाबत लोकांमध्ये जागृकता येत असून याकडे पाहण्याचा दृष्टीकोणही हळूहळू बदल चालला आहे. अपघात प्रसंगी विमा संरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मोठी आर्थिक मदत मिळू शकते. राज्य सरकारकडून विमा संरक्षणाच्या विविध योजना राबविल्या जात असून आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही सरकारने २० रुपयात विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (student) जीवन, अपघात विमा योजनेचा प्रस्ताव उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सादर केला होता. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, विमा संरक्षण सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल. “एका विद्यार्थ्यासाठी १ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण एका वर्षासाठी २० रुपयांमध्ये उपलब्ध असेल, म्हणजेच दर महिन्याला एक रूपयापेक्षाही कमी खर्च करावा लागेल. तर ६२ रुपयांचे कव्हरेज ५ लाख रुपयांपर्यंत वाढेल. मान्यताप्राप्त विविध आजारांवर उपचारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय कव्हरेज प्रीमियम ४२२ रुपये आहे,” असे आदेशात म्हटले आहे.