ऐन सणासुदीत वीजवाढीचा ‘झटका’

ऐन सणासुदीच्या दिवसांत महावितरणने ग्राहकांना (customers) वीजदरवाढीचा झटका दिला आहे. वीजखर्चात वाढ झाल्याने वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे. त्यामुळे घरगुती वीजग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रतियुनिट 35 पैसे जादा द्यावे लागणार आहेत. याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी (वीज खरेदी) आदेश काढले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महावितरणकडून सप्टेंबरच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे.

ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरू राहणार आहे. त्यामुळे दारिर्द्यरेषेखालील तसेच पाचशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरकर्त्यांवरही परिणाम होणार आहे. याबरोबरच कृषी वीजजोडणी असलेल्या ग्राहकांना (customers) प्रतियुनिट दहा व पंधरा पैसे, तर औद्योगिक ग्राहकांना प्रतियुनिट 20 पैसे जादा द्यावे लागणार आहेत. महावितरणला मार्च, एप्रिल व मे महिन्यांत अल्पकालीन करार व पॉवर एक्स्चेंजद्वारे अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली होती. त्याची भरपाई म्हणून सप्टेंबर महिन्याच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे.

मार्च 2020 मध्ये इंधन समायोजन आकार होता शून्य

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च 2020 मध्ये इंधन समायोजन आकार शून्य केला होता. त्याची फेब—ुवारी 2020 पर्यंत अंमलबजावणी झाली. त्यानंतर गेल्या वर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत हा आकार सरासरी 15 ते 20 पैसे प्रतियुनिट होता. दरम्यान, कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता.

परिणामी, वीज वितरण कंपन्यांना खुल्या बाजारातून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. त्यामुळे पुन्हा गत वर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या बिलात प्रतियुनिटमागे कमीत कमी 25 पैशांपासून जास्तीत जास्त अडीच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

घरगुती ग्राहक प्रतियुनिट दरवाढ

0 ते 100 युनिट 5 पैसे
101 ते 300 युनिट 25 पैसे
301 ते 500 युनिट 35 पैसे
501 युनिटपासून पुढे 35 पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *