दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे वाढले शुल्क! अर्ज भरायला आणखी मुदतवाढ
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेला फेब्रुवारी- मार्चमध्ये सुरवात होणार आहे. कागदांचे दर वाढल्याचे कारण देत २०१७पासून शुल्क न वाढविल्याने आता बोर्डाने इयत्ता बारावीचे परीक्षा शुल्क (Examination fee) २० रुपयांनी तर दहावीचे शुल्क ४५ रुपयांनी वाढविले आहे. ६ नोव्हेंबरनंतर परीक्षांचे अर्ज भरायला आणखी मुदतवाढ मिळेल, पण त्यासाठी जादा शुल्क आकारले जाणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत आहे. यंदा इयत्ता दहावीसाठी राज्यातील अंदाजे १६ लाख तर बारावीसाठी १४ ते १५ लाख विद्यार्थी असतील, असा बोर्डाचा अंदाज आहे. परीक्षेसाठी राज्यात साडेपाच हजारांपर्यंत केंद्रे असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी भाषा विषय सोडून अन्य विषयांच्या दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर ठेवले जाते.
फेब्रुवारीअखेरीस सुरु झालेली बोर्डाची परीक्षा मार्चअखेरीस संपेल, असे सध्याचे नियोजन आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात दहावीचे २८० तर बारावीसाठी १९० परीक्षा केंद्रे असतील. नगर जिल्ह्यात दहावीसाठी १७९ तर बारावीसाठी १०८, सोलापूर जिल्ह्यात दहावीसाठी १७६ तर बारावीसाठी ११४ परीक्षा केंद्रे असणार आहेत.
शुल्क वाढीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना आता ४९० रुपयांची तर बारावीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपयांचे शुल्क (Examination fee) भरावे लागत आहे. राज्यातील ५० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून अशा तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोर्ड परीक्षांचे नवीन शुल्क…
नियमित विद्यार्थी : ५०० रुपये
नियमित खासगी विद्यार्थी : ५०० रुपये
पुनर्परिक्षार्थी : ४८० रुपये
श्रेणी सुधार : ९२० रुपये
आयसोलेटेड विद्यार्थी : ५२० रुपये
प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय १५ रुपये
‘एमसीव्हीसी’ प्रात्यक्षिक शुल्क : प्रति विषय ३० रुपये
पेपर एकदिवसाआड की दररोज?
लोकसभेची आचारसंहिता व निवडणुकीच्या कार्यक्रमावर बोर्डाच्या वेळापत्रकात बदल होवू शकतो. निवडणुकीच्या तारखांवर परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा निश्चित होईल. अशावेळी दोन पेपरमधील एक दिवसाचे अंतर कमी करून सलग पेपर घेतले जावू शकतात, असेही बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच हा बदल होईल, अन्यथा ठरल्याप्रमाणे परीक्षा होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.