सर्वसामान्य व गरीब जनतेचा दिवाळीचा गोडवा आणखी वाढणार

सर्वसामान्य व गरीब जनतेचा सणांचा गोडवा आणखी वाढावा, यासाठी राज्य शासनाकडून (state government) ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मागील महिन्यात गौरी गणपती काळात लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ कीटमध्ये शंभर रुपयांत साखर, तेल, रवा व हरभरा डाळ प्रत्येकी एक किलोप्रमाणे देण्यात आली होती.

दरम्यान, आता दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘आनंदाचा शिधा’त आणखी पोहे व मैदा या दोन वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, सर्वसामान्यांच्या दिवाळी सणाचा गोडवा आणखी वाढणार आहे.

पारोळा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी तहसील पुरवठा विभागाकडून ३० हजार १०५ कीटची मागणी करण्यात आली असल्याची पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र महाडिक व पुरवठा निरीक्षक विश्वजीत गिरासे यांनी दिली.

शंभर रुपयांच्या अल्प दरात साधारणपणे प्रति किलो सहा वस्तू मिळणार असल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यात १३० स्वस्त धान्य दुकाने असून, आधार प्रमाणिकरण करूनच संबंधित लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी योग्य वेळी जाऊन आनंदाचा शिधा घ्यावा, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

शंभर टक्के वितरण

राज्य शासनाकडून (state government) गरजू व गरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा ही संकल्पना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यात आनंदाचा शिधा वितरण प्रक्रियेत पारोळा तालुक्यात शंभर टक्के वितरण करण्यात आले असल्यामुळे पारोळा पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी कौतुक केले असून, यावेळी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत आनंद व्यक्त केला आहे.

शंभर रुपयांत मिळणार सहा वस्तू

यंदाच्या दिवाळीनिमित्त वितरित होणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ किटमध्ये मैदा, पोहे यांचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत सहा वस्तूंचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान वितरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे सणासुदीचे दिवस गोड होणार आहेत.

तसेच आपत्तीग्रस्त बळीराजालाही दिलासा मिळणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात राज्य शासनाकडून गौरी-गणपतीच्या पार्श्‍वभूमीवर आनंदाचा शिधा वाटप झाले. केवळ शंभर रूपयात मिळणारा हा आनंदाचा शिधा अनेकांनी घेतला. मात्र, जिल्ह्यात तब्बल १९ हजार १४७ लाभ धारकांनी तो घेतलाच नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना दिवाळीला आनंदाचा शिधा घरी नेऊन आपला सण गोड करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *