हसन मुश्रीफांचं ‘ते’ चॅलेंज राजू शेट्टींनी स्वीकारलं
कारखान्यांच्या साखर (Sugar Factory) विक्रीचे आव्हान मी स्वीकारतो; पण तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सर्व कारखान्यांची आर्थिक माहिती सविस्तरपणे द्यावी. चारशे रुपये कसे देणे शक्य आहे, हे पुराव्यानिशी पटवून देऊ, असे प्रतिआव्हानही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिले.
शेट्टी म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची केलेली मागणी योग्य असून, याबाबत जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दुसरा हप्ता न देण्याच्या निर्णयावर एकमत केले आहे. आम्ही केलेली मागणी रास्त आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दोनदा बैठक घेऊन मार्ग काढण्याच प्रयत्न केला. त्यावेळेस त्या बैठकीकडे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी पाठ फिरवली.’’
मुश्रीफ यांनी मला जिल्ह्यातील मोजक्या कारखान्यांची माहिती दिल्यानंतर मी त्यामधून कशा पध्दतीने ४०० रुपये देता येतात, याबाबत खुलासा केला आहे. उर्वरित कारखान्यांची माहिती आजच द्यावी. उद्या या सर्व कारखान्यांना कसा दर देता येतो, याबाबत मी पुराव्यानिशी जाहीर करणार, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांनी साखर विकण्याचे दिलेले आव्हान मी स्वीकारतो. यापेक्षा सर्व कारखान्यांनी (Sugar Factory) दरमहा साखर कशी दराने व कोणाला विकली, याचा खुलासा करावा. मग ‘दूध का दूध व पाणी का पाणी’ होईल. देशातील व राज्यातील उसाचे उत्पादन कमी होणार व साखरेचे दर वाढत चालले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. यामुळेच कारखान्यांकडून एफआरपीमध्ये वाढ करून देण्याची रास्त मागणी ऊस परिषदेमध्ये केली आहे.’’
‘‘सहकारी कारखाने उभारणी केल्यापासून तोट्यात आहेत; मात्र याच लोकांचे खासगी कारखाने नफ्यात आहेत. त्या कारखान्यांनी ३० ते ५० टक्क्यापर्यंत लाभांश दिले. खासगी कारखान्यांनी सहकारी कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन उत्तम चालविले. त्यांनी ४०० कोटींपेक्षा जास्त कर्ज फेडून कारखाना नफ्यात आणलाच, पण इतरांपेक्षा जास्त देत आहेत; मग हे सहकारी साखर कारखान्यांना का जमत नाही?’
‘‘कर्नाटकमधील कारखानदारांनी एकजूट करत हंगामाच्या सुरुवातीस २९०० रुपये दराचा निर्णय घेतला. उसाची कमतरता लक्षात येताच एकजुटीची वज्रमूठ चारच दिवसांत सुटली. शिरगुप्पी शुगरने २९५० रुपये दर जाहीर केला; मग व्यकंटेश्वरा पाठोपाठ अरिहंत आणि उगार शुगरने ३००० रुपये दर जाहीर केले. पुन्हा शिरगुप्पी शुगरने ३०२५ रुपये दर जाहीर केला. हे कारखाने एफआरपीपेक्षा जास्त पैसे देत असतील तर मग यांच्याकडून एवढा पैसा अचानक आला कुठून, याचे उत्तर द्यावे.’’
शेतकरी अडचणीत आहे, हे आपणास मान्य असूनही राज्यकर्ते व कारखानदार यांनी एकत्रित येऊन नाबार्डकडून साखर तारण कर्ज चार टक्के व्याजाने घ्यावे, इथेनॅालचे दर वाढविणे, साखरेचे दर वाढविणे यासारखे धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते; मात्र याबाबत बोलण्याची कोणाचीच हिम्मत नाही.’’ याउलट सरकार व कारखानदार मिळून शेतकऱ्यांचा बळी घेणार असाल तर शेतकऱ्यांनाही संघटित होऊन रस्त्यावरची लढाई अधिक आक्रमक करावी लागेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले…
कारखाने तोट्यात जाण्यास शेतकरी जबाबदार कसा?
कारखाने तोट्यात मग गाळप क्षमता विस्तार कशासाठी?
कारखानदारांचा हव्यासाचेच हे परिणाम
कारखान्यांची कर्जे वाढण्यास प्रशासन जबाबदार
वारेमाप खर्च आणि कारखाना खरेदी दरात ढपले