…मग दरमहा चेअरमनना 48, सीईओंना 40 लाख पगार कसा देता : राजू शेट्टी
आम्हाला बँकेकडून कर्जे घ्या म्हणता. बँका तुमच्या, मंत्री व आमदार तुम्ही… मग तुम्हाला शेतकर्यांना (farmer) पैसे देताना हात का इवळतोय. उठसूट कारखाने तोट्यात म्हणता मग रेणुका शुगर्सच्या चेअरमनना दरमहा 48 लाख, तर सीईओंना 40 लाख पगार कसा देता, असा सवाल ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना केला. जयसिंगपूर येथे शेट्टी यांचे सातव्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, दालमिया शुगर्स कंपनीचे एकूण पाच कारखाने असून, दिवसाला 37 हजार 150 टन गाळप क्षमता आहे. या कारखान्याने गेल्यावर्षी 250 कोटींचा निव्वळ नफा मिळवला; तर 94 कोटी 12 लाख आयकर भरला. 32 कोटी 38 लाख इतका लाभांश दिला. यासगळ्याची टक्केवारी 150 टक्के आहे. त्यांनी गेल्यावर्षी प्रतिटन 3200 भाव दिला असला, तरी त्यांनी प्रतिटन 400 रुपयाचा हप्ता दिल्यास त्यांना फक्त 60 कोटींची गरज आहे. कंपनीच्या दर्शनी किंमत 2 रुपये असून, आजची किंमत 445 रुपये 30 पैसे झाली आहे. कंपनीने हा जो नफा कमवलाय तो निव्वळ आणि निव्वळ ऊस उत्पादकामुळे कमवला आहे. त्यामुळे इंग्रजसुद्धा इतकं लुटत नव्हते, असे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाचे 400 रुपये कारखानदारांनी देणे गरजेचे होते. यासाठी मुख्यमंत्र्यांचे उंबरठे झिजवले. असे असताना सरकार शेतकर्यांना (farmer) मदत करण्याऐवजी पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कारखानदारांना पाठीशी घालत आहे. शेतकरी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत आहे. पोलिस म्हणतात तुमच्या मागण्या बरोबर आहेत; पण आम्हाला वरून दबाव असल्याचे सांगतात.
म्हणजेच हा दबाव कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे. बुडव्या कारखानदारांना मात्र त्वरित बंदोबस्त मिळतो व बंदोबस्तात ऊस कारखान्याला जातो. हा कुठला न्याय आहे. राज्याबाहेर जाऊन महाराष्ट्र पोलिस सुरक्षा देतात हा कुठला न्याय. तुम्हाला आमदार विकत घेण्याची सवय आहे. म्हणून तुम्ही शेतकर्यांना लुटू पाहणार असाल, तर शेतकर्यांना न्याय मिळूपर्यंत गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.