मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडवर!
मराठा आरक्षणासाठी (reservation) आंदोलनाची भूमिका घेणार मनोज जरांगे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जरांगे आजपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून (15 नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ते आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे सभा घेणार आहेत. ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा एकुण सहा टप्प्यांमध्ये आहे. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु होत आहे. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याचा शुभारंभ होईल. दरम्यान, ‘हा दौरा स्वखर्चाने होणार असून मराठा आंदोलनासाठी कोणी पैसे मागत असेल तर देवू नका, असे आवाहनही जरांगेंनी केले आहे.
आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
मराठा आंदोलनाला डाग लागता कामा नये. आरक्षण (reservation) घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. १ डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे. त्याआधी मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.