लालपरी होणार आजूनच सुसाट; शासनाने घेतला महत्वाचा निर्णय!
राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी आणखी सक्षम होणार आहे. एसटी महामंडळाने २,२०० सध्या बस खरेदी (Purchase) करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन बस मार्च २०२४ पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. याकरिता एसटी महामंडळाने सोमवारी ई- निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहे.
महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एसटीची वाढती प्रवासी संख्या बघता ताफ्यात नवीन बस येणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन बसची खरेदीच झाली नसून आता नवीन बस सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बस आहेत. यापैकी १२ हजार बस साध्या आहे. आता या सध्या बसच्या ताफ्यात नव्या कोऱ्या २,२०० साध्या एसटी बसची भर पडणार आहे.
वर्ष २०२३-२४च्या अर्थसंकल्पात एसटीला डिझेलवरील साध्या बस घेण्यासाठी राज्य शासनाने ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ११ मीटर चेसिसवर बांधलेल्या २,२०० तयार परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील.
बस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी एसटी महामंडळाने प्रथमतः थेट तयार बस घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रिया राबवली आहे. याशिवाय एसटी महामंडळाने ५,२०० एसी इलेक्ट्रिक बस बांधणीचे कंत्राट ऑलेक्ट्रॉ कंपनीला देण्यात आले आहे. प्रोटोटाईप इलेक्ट्रिक बसची तपासणी चाचणी पूर्ण झाल्यावर या बस टप्प्याटप्प्याने जानेवारी २०२४ अखेर ताफ्यात दाखल होणार सुरुवात होणार आहे. या बस नऊ मीटरच्या असणार आहेत.
तत्काळ गरज असल्याने खरेदी
एसटी महामंडळ चेसिस म्हणजे सांगाडा खरेदी (Purchase) करून त्यावर आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेत बसबांधणी करण्यात येत होती; मात्र मध्यवर्ती कार्यशाळेत साधारण दिवसाला चार गाड्यांची निर्मिती करण्याची एसटी महामंडळाची क्षमता आहे. ही संख्या अपुरी असल्याने आणि गाड्यांची तत्काळ गरज असल्याने थेट बाहेरूनच चेसिस बांधणी करत गाड्या खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.