मोठा निर्णय! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत बदल
विविध कारणांमुळे शेतकऱ्याच्या होत असलेल्या मृत्यू किंवा अपंगत्वामुळे कुटुंब उध्वस्त होऊन अडचणी निर्माण होतात. अशावेळी संबंधित शेतकरी कुटुंबाला राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून (scheme) दोन लाखांची मदत मिळणार आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना ९ डिसेंबर २०१९ पासून सुरु झाली. पण योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांचा शासनाबाबतचा रोष वाढल्यामुळे सरकारने योजनेत सुधारणा करून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ १७ एप्रिल २०२३पासून राबवण्यास सुरवात केली.
पूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या एकाच नातेवाईकांना भरपाई मिळत होती. पण सुधारित योजनेत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहिवाटीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) अशा दोघांना लाभ घेता येणार आहे.
योजनेअंतर्गत ‘या’ अपघातांचा समावेश
योजनेत रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बूडून मृत्यू , जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडल्याने अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे- चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू , बाळंतपणातील मृत्यू , दंगल, नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात, रस्त्यावरील वाहन अपघात आणि त्यात मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना योजनेचा (scheme) लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण दोघांना योजनेतून लाभ मिळतो.
अपघाती मृत्यूनंतर अशी मिळते मदत
– अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी : दोन लाख रूपये
– अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी : एक लाख रूपये
लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
– शेतीचा ७/१२ उतारा
– संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूचा दाखला
– शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठ्याकडील ‘६- क’नुसार मंजूर झालेली वारस नोंद
– शेतकऱ्याच्या वय पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र
– घटनेचा प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटलांच्या माहितीचा अहवाल
अपघातानंतर कसे मिळते अनुदान?
– शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर अपघातग्रस्त शेतकरी किंवा वारसदाराने सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३० दिवसात सादर करावा.
– संबंधित महसूल व पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकाऱ्यांचे पथक त्या शेतकऱ्याच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अहवाल आठ दिवसात तहसिलदारांना द्यावा.
– तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत ३० दिवसात संबंधित शेतकरी किंवा त्याच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेवून तालुका कृषि अधिकाऱ्यांमार्फत भरपाई जमा केली जाते.