निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा दिलासा

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, याआधीही मोदी सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने (central government) गरिबांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या योजनेंतर्गत गरीबांना दरमहा पाच किलो रेशन मोफत दिले जाते.

मंत्रिमंडळाने PMGKAY योजनेला १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना काळात लॉकडाऊनमुळे त्रस्त गरीबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ अटींनाही मंजुरी देण्यात आली, जे केंद्र आणि राज्यांमधील कर महसुलाच्या वाटणीवर निर्णय घेण्याशी संबंधित आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, १६ वा वित्त आयोग ऑक्टोबर २०२५ पर्यंत आपला अहवाल सादर करेल.

कोट्यवधी लाभार्थ्यांना दिलासा

PMGKAY म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला गरिबांच्या सोयीसाठी प्रत्येक वेळी मुदतवाढ देण्यात आली. मोफत रेशन योजनेचा विस्तार करण्याच्या मोदी सरकारच्या (central government) या निर्णयाचा देशभरातील एकूण ८१ कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार असून या सर्वांना पाच किलो धान्य मोफत मिळेल.

केंद्र सरकारवर लाखो कोटींचा खर्च

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी PMGKAY योजनेंतर्गत मोफत रेशन देण्याची माहिती सामायिक केली. त्यांनी म्हटले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा ८१ कोटी लोकांना होणार आहे. यामध्ये भारत सरकार ११ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करेल. गेल्या पाच वर्षांत सुमारे १३.५० कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत, असेही त्यांनी म्हटले.

कोविड-१९ संसर्गाच्या काळात दिलासा म्हणून सरकारने २०२० मध्ये PMGKAY ची सुरुवात केली होती, ज्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 5 किलो अनुदानित खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, प्रति लाभार्थी दरमहा पाच किलो अन्नधान्याचे मोफत वाटप जाते. या योजनेचा कालावधी अनेक वेळा वाढवल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये PMGKAY योजना मोफत रेशन प्रदान करणाऱ्या NFSA अंतर्गत आणण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *