दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (student) महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. या परीक्षेत आता विद्यार्थ्यांना टक्केवारी किंवा श्रेणी दिली जाणार नाही. सीबीएसईने 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून हा बदल केला आहे. यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली. सीबीएसई ओव्हरऑल डिव्हीजन आणि डिस्टिंक्शन देणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी पाच पेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल तर प्रवेश देणारी संस्था बेस्ट 5 विषयांचे गुण घेऊन प्रवेश देणार आहे.

काय असणार नवीन पद्धत

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी, श्रेणी दिली जाणार नाही. यासंदर्भातील तरतूद सीबीएसईच्या नियमावलीत करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांचे (student)सर्वोत्तम पाच विषय निवडून प्रवेश दिला जाणार आहे. यंदापासून सीबीएसईकडून गुणांची टक्केवारी, श्रेणी दिली जाणार नाही. तसेच नोकरीसाठी गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास नोकरी देणारी नियोक्ता विषयांवरुन निर्णय घेऊ शकतात. ही संस्था गुणांची बेरीज करुन टक्केवारी काढू शकते. सीबीएसईने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची पद्धत बंद केली आहे. त्यानंतर आता श्रेणी आणि टक्केवारी देण्याची प्रथा बंद केली.

सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर

सीबीएसईने दहावी आणि बारावीची परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या आहेत. या परीक्षांना १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. जवळपास ५५ दिवस या परीक्षा चालणार आहे. दहावीची परीक्षा २१ मार्च तर बारावीची परीक्षा ५ एप्रिल रोजी संपणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. सीबीएसईचा वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेला २१ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. बारावीच्या परीक्षेला १६ लाखांहून अधिक बसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *