मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींचा सक्षमीकरण विभाग राष्ट्रीय शिष्यवृत्ती (scholarship) पोर्टलद्वारे सरकारने नववी-दहावीच्या अंपग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू केली आहे. पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत होती; परंतु केंद्र सरकारने त्यास मुदतवाढ दिली असून, अंतिम तारीख 31 डिसेंबर करण्यात आली असल्याची माहिती योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना 9 ते 14 हजार वार्षिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो, विद्यार्थीसंख्येमध्ये वाढ होईल या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना या योजनेबाबत माहिती द्यावी. योजनेसाठी पात्र होणार्‍या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता सर्व नोंदणीकृत शाळांचे मुख्याध्यापक आणि नोडल अधिकारी यांनी दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाद्वारे रितसर पडताळणी करावी, असेदेखील पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी काय आहे पात्रता?

अनुदानित शाळांतील नववी-दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (scholarship) दिली जाते. विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. नियमानुसार सक्षम अधिकार्‍याचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. एकाच पालकाच्या 2 पेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. शिष्यवृत्ती ही एका इयत्तेला एका वर्षासाठीच लागू राहील. विद्यार्थ्यांने तीच इयत्ता रिपीट केल्यास लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील, तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची (लाभदायी) शिष्यवृत्ती स्वीकारून दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसाहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *