भावी शिक्षकांसाठी चांगली बातमी, राज्यात बंपर भरती
राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक (teacher) भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार आत्तापर्यंत १२ हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे. यामुळे बंपर पोलीस भरतीनंतर आता राज्यात बंपर शिक्षक भरती होणार आहे. शिक्षक भरतीचे खरे चित्र १५ जानेवारीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा 30 हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे
शिक्षकांची 30 हजार पदे भरली जाणार
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामधील 30 हजार पदे भरण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. 30 हजार पदे म्हणजे रिक्त पदांपैकी केवळ 70 टक्के पदे आहेत. राज्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या रोष्टरबाबत काही आक्षेप आहेत. त्यामुळे 10 टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या केवळ रिक्तपदांपैकी 70 टक्के पदांची जाहिरात काढली जाणार आहे. या जागाही 30 हजारांच्या जवळपास आहे. यामुळे दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरु करण्यात आली आहे.
शिक्षक नसल्याने अनेक अडचणी
राज्यात शासकीय शाळांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी चार शिक्षकांची पदे मंजूर असताना एक शिक्षक शाळा चालवत आहे. पहिली ते चौथीचे वर्ग एक शिक्षकच (teacher) चालवत असल्याची अनेक उदाहरणे ग्रामीण भागात आहेत. शिक्षक संघटनांकडून अनेक वेळा भरतीची मागणी करण्यात आली होती. अखेर आता जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या भरतीसाठी या शाळांमधील रोष्टरची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. तसेच खासगी संस्थाच्या रोष्टरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्या संस्थाच्या जाहिराती प्रसिध्द होतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार हे स्पष्ट होणार आहे.
जाहिराती येण्यास सुरुवात
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानंतर जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान या जाहिरातीसंदर्भात शिक्षक भरतीने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत इंग्रजी माध्यमांमधील मुलांना झुकते माप दिल्याचा आरोप केला आहे. शिक्षक भारतीच्या आरोपावर अधिकार्यांनी स्पष्टीकरण केले आहे. आतापर्यंत निम्म्याच जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या आहेत. आणखी जिल्हा परिषदांच्या जाहिराती लवकरच येणार आहेत. भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी असणार आहे.