आता काय? 14 दिवसांसाठी ‘या’ रेल्वे ठप्प
अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार्श्वभूमीवर सध्या रेल्वे विभागाकडूनही विशेष आखणी केली जात आहे. तिथं रेल्वे विभाग प्रवाशांसाठी खास सोयी करत असतानाच इथं काही रेल्वे गाड्या मात्र रद्द (canceled) करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्हीही येत्या काळात लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करण्याचा बेत आखला असेल तर आधी ही माहिती पाहा.
उपलब्ध माहितीनुसार नांदेडपासून उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्या पुढच्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. मथुरा यार्ड रिमोडलिंगच्या कामासाठी रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या पूर्वनियोजित कामांमुळे सचखंड एक्स्प्रेससह दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या रेल्वे असणार रद्द?
हजरत निजमुद्दीन येथून निघणारी 12754 हजरत निजामुद्दीन – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 31 जानेवारी या दिवशी रद्द (canceled) असेल.
12753 नांदेड-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस 23 आणि 30 जानेवारी या दिवशी रद्द करण्यात आली आहे.
12752 जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस 28 जानेवारी आणि 4 फेब्रुवारी या दिवशी रद्द करण्यात आली आहे.
12716 अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळासाठी रद्द करण्यात आली आहे.
उत्तर मध्य रेल्वे विभागाच्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन यार्ड रिमॉडलिंगच्या या कामासाठी रेल्वेकडून मेगा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. यासाठी मराठवाड्याहून उत्तर भारताच्या दिशेनं जाणाऱ्या 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यानच्या काळात अयोध्येच्या दिशेनं जाण्याचे बेत आखलेल्या रामभक्तांचीही मोठी गैरसोय होणार आहे हे नाकारता येत नाही.
पुण्यातून अयोध्येसाठी खास रेल्वे
अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांनी सातत्यानं केल्यामुळं रेल्वे विभागाकडून अखेर या मागणीची पूर्तता करण्यात येत आहे. या धर्तीवर 30 जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येच्या दिशेनं निघणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.