वर्ल्ड कपच्या ५ दिवस आधी फायनल, जाणून घ्या स्पर्धा सुरू कधी होणार

(sports news) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तारखेवरून बरीच चर्चा सुरू आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहेत, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न आहेच. त्यात मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल २०२४ चे १७ वे पर्व २२ मार्चपासून सुरू होणार आहे. पाच दिवस आधी महिला प्रीमिअर लीग सुरू होत आहे. आयपीएल २६ मे पर्यंत खेळवली जाणार असल्याचे वृत्त आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होण्याच्या बरोबर ५ दिवस आधी आयपीएलची फायनल खेळवली जाणार आहे. १ जूनपासून वेस्ट इंडिज व अमेरिका येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझीसोबत चर्चा केल्यानंतर तात्पुरत्या तारखा समोर आल्या आहेत. WPL चा दुसरा हंगाम २२ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे आणि लीगचे आयोजन बंगळुरू व दिल्ली येथे केले जाईल. अधिकृत घोषणा एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. बीसीसीआयला बहुतांश क्रिकेट मंडळांकडून त्यांचे खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत उपलब्ध असतील असे आश्वासन मिळाले आहे. तथापि, १ जूनपासून वर्ल्ड कप सुरू होत आहे, हे पाहता काही खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी लवकर रवाना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

TATA मुळे आयपीएल मालामाल; पुढील ५ वर्ष देणार बक्कळ रक्कम

दरम्यान, TATA समुहाने पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे टायटल हक्क जिंकले आहेत आणि यापुढे २०२८ पर्यंत TATA IPL असेच पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलने टायटल हक्कासाठी जाहीरात काढली होती आणि आदित्य बिर्ला ग्रुप यासाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त होते, परंतु ‘TATA’ ने बाजी मारली. (sports news)

इन्व्हिटेशन टू टेंडर (ITT) दस्तऐवजात नमूद केलेल्या अटींनुसार, टाटाला इतर कॉर्पोरेट संस्थेने केलेल्या कोणत्याही स्पर्धात्मक ऑफरशी जुळवून घेण्याचा विशेषाधिकार होता. या तरतुदीच्या अनुषंगाने, समूहाने आदित्य बिर्ला समूहाने सादर केलेल्या २५०० कोटींच्या ऑफरचा स्वीकार केला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता टाटा दरवर्षी आयपीएलला ५०० कोटी देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *