धोका! अटल सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर
काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं (Sea bridge) अर्थात अटल सेतूचं उद्घाटन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते या सेतूचं लोकार्पण पार पडलं. ज्यानंतर मोठ्या संख्येनं वाहनांनी या सेतूनवरून प्रवास केला. आतापर्यंत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा आकडा सातत्यानं वाढत असून, येत्या काळात या सागरी सेतूवरून प्रवास असाच सुरु राहणार असून मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचं अंतर काही मिनिटांत ओलांडण्यासाठी अनेकांनाच मोठा आधार मिळणार आहे. पण, त्यातच आता एका धोक्यानं डोकं वर काढल्यामुळं यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
ही कोणत्या धोक्याच्या सूचना?
उपलब्ध माहितीनुसार शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूचा कंट्रोल रुम उरण- पनवेल (Uran Panvel) परिसरात असून, संपूर्ण अटल सेतूचं कामकाज या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर उभ्या असणाऱ्या कंट्रोल रुम अर्थात नियंत्रण कक्षातून चालतं. पण, याच कंट्रोल रुमच्या आजुबाजूला फार कमी अंतरावरच दगडांच्या खाणी, डांबर, रेडिमिक्स प्लांट आहेत. परिणामी तेथून निघणाऱ्या धुळीचा थेट परिणाम कंट्रोल रुमच्या दृश्यमानतेवर होताना दिसत आहे.
दरम्यान, आकडेवारीनुसार पाहायचं झाल्यास नवी मुंबई, पनवेल, उरण भागामध्ये 150 हून अधिक दगडखाणी क्रशर, रेडिमिक्स आणि डांबर प्लांट आहेत, यामध्ये पनवेलमधील 98 आणि उरण जासईतील 11 प्लांटला समावेश आहे. पण अद्यापही दगडखाणी क्रशर, डांबर आणि तत्सम प्लांट परवानगीअभावी सुरु करण्यात आलेले नाहीत. पण, तरीही धुळीचा त्रास मात्र आतापासूनच सतावू लागला आहे.
अटल सेतूच्या (Sea bridge) कंट्रोल रुमनजीक असणाऱ्या या प्लांटमुळं कंट्रोल रुमला उदभवणारा एकंदर धोका पाहता हे प्लांट बंद करण्याची मागणी एमएमआरडीएनं केली होती. परिणामी काही दगडखाणी आणि रेडिमिक्स प्लांट अद्यापही बंद आहेत. याबाबतची सविस्तर चर्चा MMRDA सोबत केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली. तेव्हा आता या प्रश्नाव एमएमआरडीएकडून नेमका कोणता तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.