विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आता असणार बंधनकारक!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या श्रेयांक आराखड्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी (student) इंटर्नशिप बंधनकारक असून त्याबाबतची कार्यपध्दती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णयातून जारी केली आहे.
इंटर्नशिप बंधनकारक!
एनईपी अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ व महाविद्यालयाने त्यांच्या परिसरातील औद्योगिक कंपन्या, लघुउद्योग, व्यावसायिक संस्था, बँका व वित्तीय संस्था, शासकीय संस्था आदींबरोबर समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी इंटर्नशिप सेलची स्थापना करावी. या सेलचे प्रमुख म्हणून एका व्यक्तीची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच इतर तज्ज्ञ व विद्यार्थी सदस्य म्हणून नियुक्त करावेत असेही शासन निर्णयात म्हटले आहे. नोकरीसाठी विद्यार्थी पूर्णपणे तयार होईल, या दृष्टीने त्याचा व्यक्तिमत्व विकास करावा, अशा सूचना विद्यापीठ व महाविद्यालयांनाही शासन निर्णयात दिल्या आहेत.
सर्वसमावेशक अहवाल…
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी (student) इंटर्नशिप कालावधीत शिकलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा एक सर्वसमावेशक अहवाल तयार करायचा आहे. या अहवालावर इंटर्नशिप पर्यवेक्षक, नोडेल ऑफिसर आणि मार्गदर्शक शिक्षक स्वाक्षरी करतील. विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याच्या मूल्यमापनाकरिता संबंधित विभागाने स्थापन केलेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ समिती समोर अनुभवाचा परिसंवाद देणे बंधनकारक राहील, असेही या निर्णयात नमूद केले आहे. इंटर्नशिप कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ञांची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढवणे शब्दसंग्रह सुधारणे, व्यक्तिगत माहिती व प्रपत्राची तयारी आणि ईमेल लेखनासाठी मदत करावी. त्याचप्रमाणे गट चर्चा मुलाखत कौशल्य , अभियोग्यता प्रशिक्षण आणि सराव चाचण्या तांत्रिक अहवाल लेखन, सादरीकरण कौशल्य, परदेशी भाषा निपुणता इत्यादी बाबत काम करावे, अशा सूचनाही महाविद्यालय तसेच विद्यापीठांना दिल्या आहेत.