शिक्षक भरती प्रक्रियेतून कला शिक्षकांना वगळले!
अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरतीला (Teacher recruitment) मुहूर्त लागला आहे; परंतु पद मंजुरीअभावी या भरती प्रक्रियेत कला शिक्षकांसाठी शून्य जागा दिसत आहेत. यामुळे संतप्त पात्र व इच्छुक उमेदवारांनी शासन धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षक भरती 2012-13 पासून बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. जानेवारी 2024 पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 20 हजारांहून अधिक शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्याअनुषंगाने पवित्र पोर्टलवर भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 900 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 250 हून अधिक कला शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित शाळांमध्ये कला शिक्षक नाहीत. राज्याचा विचार करता ही संख्या 6 हजारांच्यावर आहे. हजारो तरुण सुशिक्षित तरुणांनी कला शिक्षक होण्यासाठी एटीडी, एएम, जीडी आर्ट यासारखे कोर्सेस केले आहेत. सध्या ते शिक्षक भरतीची वाट पाहात आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्याप कला शिक्षकांची भरती झाली नसल्याचा आरोप पात्र उमेदवारांनी केला आहे.
राज्य सरकारने कला व क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करून नियमित शिक्षकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. मात्र, सध्या राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये (Teacher recruitment) कला शिक्षकांच्या जागांचा समावेश केलेला नसल्याने पात्र उमेदवार हवालदिल झाले आहेत. सुसंस्कृत, सुशिक्षित व कलासंपन्न समाज घडविण्यासाठी शाळांमध्ये कला शिक्षकांची गरज आहे. शासनाने कला शिक्षकांच्या पदांचा भरती प्रक्रियेत समावेश करुन पवित्र पोर्टलद्विारे कला शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
…मग चित्रकार, शिल्पकार, गायक कसे घडणार?
महाराष्ट्र हे सांस्कृतिक परंपरेने समृद्ध राज्य आहे. अशा राज्यात कला शिक्षकांचे प्रमुख स्थान असायला हवे; परंतु आजघडीला बहुतांश शाळांमध्ये कला शिक्षकच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने कला शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविली नाही, तर शाळांमध्ये चित्रकार, शिल्पकार, गायक, वादक कसे घडणार, असा सवाल केला जात आहे.