मनोज जरांगेंची तब्येत खालावली, महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद
मराठा समाजाला आरक्षण (reservation) मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. १० तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.
सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. रांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत. जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्यपथक अंतरवलीमध्ये दाखल झालं. मात्र नाडी आणि बीपी तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला. आमचे डॉक्टर्स दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहे, तपासणीसाठी त्यांच्यासाठी बोलण्याच प्रयत्न करत आहेत. त्यांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं.
त्यांची तब्येत चिंतजनक होताच, त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना – जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.
अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही
मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही, असे खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे बघा. सरकारचे काय डोळे गेलेत का, अक्कल नाही का यांना अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारवर टीका केली.
मंगळवारी रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आणि पाणी पिण्याची विनंती केली. मात्र जरांगे पाटलांनी नकार दिला. ग्रामस्थांकडूनही जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती करण्यात आली, पण जरांगे पाटील सगेसोयरेच्या कायद्यावर ठाम आहेत, त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या महिला, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ‘आम्हाला आमचे दादा पाहिजेत, त्यांनी थोडं तरी पाणी घ्यायला पाहिजे. सरकारने फक्त आरक्षणाचं आश्वासन दिलं, त्याची पूर्तता केली नाहीच. काय उपयोग त्याचा ? सरकारने लवकरात लवकर मागणी मान्य करावी ‘ उद्विग्न स्वरात महिलांनी त्यांचं म्हणणं मांडलं.
सोशल मीडियावर बीड बंदचे मेसेज व्हायरल
तर सोशल मीडियावरून बीड बंदचे मेसेज व्हायरल झाले आहेत. जरांगेच्या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने बंदची हाक या मेसेजमधून देण्यात आली आहे. सरकार गंभीर नसल्याचा आरोप बीडमधील मराठा आंदोलकांनी केला आहे. यामुळे बीड बंदसह महाराष्ट्र बंदची हाक आज देण्यात आली आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे. शाळा महाविद्यालये आणि बससेवा देखील बंद राहणार आहे. (reservation)
20 फेब्रुवारीला सरकारचं अधिवेशन
तर 20 फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.