उद्यापासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यंदा या परीक्षेसाठी (exam) एकूण १४ लाखांहून अधिक नोंदणी केली आहे. तर महामुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूहकॉपी, पेपर व्हायरल होणे असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा देखील परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत. यंदा प्रात्यक्षिक परीक्षेचे ऑनलाईन गुणांकन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रनर अर्थात कष्टोडीयनला कष्टडीतून पेपर घेताना जीपीएस ऑन करायचे आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ शुटींग करावे लागणार आहे. रनर म्हणून खात्रीशीर व्यक्तीचीच नियुक्ती यंदा करण्यात आली आहे. परीक्षा काळात फिरणाऱ्या भरारी पथकातील सदस्यांना यंदा नवीन आयकार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पथकात वरीष्ठ शिक्षकांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भरारी पथकातील सदस्य देखील संयमाने कारवाई करणार असून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करून त्याचा अहवाल तातडीने राज्य मंडळाला कळविणार आहेत.
HSC Board Exam 2024 : विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा
परीक्षेची (exam) पूर्वतयारी करताना शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्या.
परीक्षेदरम्यान शक्यतोवर जागरण करणे टाळावे.
झोपेच्या वेळेत अभ्यास व अभ्यासाच्या वेळेत झोप टाळा.
परीक्षेच्या काळात मन अगदी उत्साही सकारात्मक ठेवा.
परीक्षा काळात टीव्ही, मोबाईल, वादविवाद या गोष्टीत पडू नका.
वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा हॉलमध्ये हजर राहा.
ओळखपत्र, दोन तीन पेन, कंपास, पाण्याची बॉटल, घड्याळ, रुमाल आठवणीने सोबत ठेवा.
परीक्षागृहातील पर्यवेक्षक किंवा शिक्षकांच्या सूचनांचे पालन करा.
उत्तर पत्रिका हातात दिल्यानंतर त्यावर बैठक क्रमांक, स्वाक्षरी, विषयाची माहिती, तारीख, माध्यम इत्यादी सर्व व्यवस्थित नमूद करा.
पेपर सोडवल्यानंतर त्या पेपरमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याचा जास्त विचार करत बसू नका.