बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार (Boycott) टाकला आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्यावर आणि इतर मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या वारंवार आंदोलने केल्यानंतरही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार सुरु केला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

वेतन, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. तरीही शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्याबाबत वारंवार आंदोलने करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीदेखील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीला वेळ लागला होता. त्यानंतर सरकारने काही मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला.

शिक्षकांच्या मागण्या काय आहेत?

बहिष्काराच्या (Boycott) माध्यमातून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी सर्व वाढीव पदांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी कार्यरत असलेल्या फक्त 283 शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढण्यात आला होता. यासोबत राज्यात काही शिक्षकांचे समावेशन करण्यात आले. मात्र अनेक शिक्षकांचे समावेशन अद्यापही झालेले नाही. तसेच यापैकी एकाही शिक्षकाचे वेतनही सुरू झालेले नाही. आयटी शिक्षकांना वेतनश्रेणी, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे या मागण्यांचे आदेश काढण्यात आले नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे.

12वीच्या अंतिम परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाल्या आहेत. 12वी बोर्डाची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली आहे. या परीक्षा 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2024 च्या शेवटच्या दिवशी विद्यार्थांचा समाजशास्त्राचा पेपर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *