जरांगेंचे समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठी निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर रविवारी दुपारी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा सामाजाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचे पडसाद घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये उमटले असून मराठा आंदोलकांनी या अटकेला विरोध करत एक एसटी बस जाळली आहे. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने (administration) घेतला आहे.
भांबेरी गावात मुक्काम
अंतरवाली सराटी येथे रविवारी समाजातील सदस्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना माझा बळी हवा आहे असं म्हणत आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं. तसेच संतापलेल्या जरांगे-पाटलांनी थेट मुंबईमधील फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर आपण जाणार असल्याचं म्हटलं. भाषण संपता संपता अस्वस्थ झालेले जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणावरुन उठून चालू लागले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न अनेक सहकाऱ्यांनी केला मात्र जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी आपला प्रवास सुरुच ठेवला. रविवारी रात्रीचा मुक्काम जरांगे-पाटील यांनी भांबेरी गावात केला. जरांगेंबरोबर मोठ्या संख्येनं मराठा सामाजातील सदस्य आहेत. सोमवारी सकाळी 11 च्या सुमार जरांगे पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. दरम्यान, या साऱ्या गोंधळामध्ये पोलिसांनी मनोज जरांगे-पाटलांच्या 2 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी कोणाला केली अटक?
मुक्कामी असलेल्या भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या 2 सहकाऱ्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात गेण्यात आलेल्यांची नावं शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे अशी आहेत. हे दोघेही मराठा आंदोलनामध्ये सक्रीयपणे सहभागी असून मनोज जरांगे-पाटलांबरोबर निघालेल्या मराठा आंदोलकांमध्येच या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रात्रीपासूनच भांबेरी गावामध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
बस जाळली
जालना जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून देण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी बस पेटवल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे-पाटलांबरोबचे मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यातूनच त्यांनी ही बस जाळल्याचं सांगितलं जात आहे.
प्रचंड पोलीस बंदोबस्त
प्रशासनाने (administration) भांबेरी गावाबरोबरच संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या हजारो मराठा आंदोलक जरांगे-पाटील मुक्कामी राहिलेल्या भांबेरी गावामध्ये आहेत. सकाळी 10.30 ते 11 दरम्यान जरांगे आपल्या समर्थकांबरोबर मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु करतील अशी माहिती देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खोटा कागद दिला
दरम्यान, भांबेरीमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ गोळा झालेल्या आंदोलकांकडून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासने केला. यावेळेस बोलताना एका आंदोलकाने, मुंबईला जाण्याचा उद्देश काय आहे? यावर बोलताना, “यापूर्वी आम्ही शांतते मुंबईत गेलो होतो. आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खोटा कागद देऊन फसवणूक करुन माघारी पाठवलं आहे. आमचा अंत पाहिला जात आहे. आता आम्ही शांततेत मुंबईला जाणारच,” असं म्हटलं. तर अन्य एकाने आम्ही जरांगे-पाटलांच्या भूमिकेशी सहमत असून आरक्षण घेऊनच मुंबईतून परत येणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.