सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ दोन रेल्वे स्थानकांचे ऑनलाइन उद्घाटन
मिरज आणि हातकणंगले रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन (Online opening) करण्यात आले. देशातील 556 रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी सांगली जिल्ह्यातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या दोन रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. दोन्ही रेल्वे स्थानकांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला असून या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत उभारण्यात येणार आहे. सांगली रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी प्रत्येक रेल्वे थांबण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सांगली रेल्वे स्थानकाची इमारत जुनी होती. त्याचा विकास करण्यासाठी खासदार संजय पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री तसेच मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगली रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सांगली रेल्वे स्थानकाचा अमृत भारत रेल्वे स्थानकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले रेल्वे स्थानक देखील महत्त्वाचे असून या रेल्वे स्थानकाचा देखील आता अमृत भारतअंतर्गत विकास करण्यात येणार आहे. दोन्ही रेल्वे स्थानकांच्या कोनशिलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन (Online opening) करण्यात आले. पुढील काही वर्षांमध्ये दोन्ही रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार असून नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे.
तसेच सांगली रेल्वे स्थानकातून अनेक प्रवाशांची चढ-उतार असल्याने या ठिकाणी प्रत्येक गाड्यांना थांबा देण्यात यावा, रेल्वेमध्ये पाणी भरण्याची सोय करण्यात यावी, सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी मालधक्क्याची व्यवस्था करावी, इत्यादी मागण्या नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी रेल्वेकडे करणार असल्याचे सांगितले.
मिरजेचा मॉडेल स्थानकात समावेश
मिरज रेल्वे जंक्शन विकास हा मॉडेल रेल्वे स्थानकांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. रेल्वेमार्फत मिरज रेल्वे जंक्शनचा विकास करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा देखील तयार झाला असून लवकरच या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले.