‘सुळकूड पाणी’प्रश्नी उद्या मुंबईत बैठक
इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड पाणीपुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, 1 मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये बैठक आयोजित केली आहे. याबाबत अवर सचिव नीलेश पोतदार यांनी कळवले आहे. बैठकीत ठोस तोडगा निघणार का, याकडे इचलकरंजीसह दूधगंगा काठच्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
इचलकरंजी शहरवासीयांना स्वच्छ व भविष्यातील तरतूद म्हणून अमृत 2.0 अभियानांतर्गत 162 कोटींची सुळकूड उद्भव दूधगंगा योजना शासनाने मंजूर केली आहे. या योजनेला कागल व शिरोळ तालुक्यातील दूधगंगा काठावरील ग्रामस्थांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. इचलकरंजी शहरवासीयांच्या वतीने योजना कार्यान्वित व्हावी, अशी आग्रही मागणी विविध आंदोलनांद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे बैठक झाली होती. रेखावार यांनी राज्य शासनाला अहवाल पाठवला होता, तर सुळकूड योजना (Water Supply Scheme) कार्यान्वित होण्यासाठी कृती समितीने इचलकरंजी बंदसह प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता; मात्र खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे यांनी समन्वयाने मार्ग काढण्याच्या अनुषंगाने 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत बैठक आयोजित केली होती; मात्र ही बैठक स्थगित झाली होती.
योजना कार्यान्वित होण्यासाठी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, तर आम्ही सावित्रीच्या लेकी संघटनेच्या चार महिलांनी उपोषण केले होते. खा. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे परिस्थितीची माहिती दिली होती. बैठक घेण्याविषयी खा. माने यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठक होणार आहे.
बैठकीसाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रण
बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. माने, खा. संजय मंडलिक, आ.प्रकाश आबिटकर, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, समरजितसिंह घाटगे, गणपतराव पाटील, विठ्ठल चोपडे, रवींद्र माने यांच्यासह कृती समिती व दूधगंगा बचाव कृती समितीचे प्रत्येकी दोन सदस्य, संबंधित शिष्टमंडळ व राजकीय प्रतिनिधी, अधिकारी यांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.