हार्दिक पांड्या बोलत नाही, डायरेक्ट करुन दाखवतो, तीच त्याची स्टाइल
(sports news) IPL 2024 चा सीजन सुरु व्हायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. कधी एकदा आयपीएलचा धमाका सुरु होतोय, असं क्रिकेटप्रेमींना झालय. यंदाचा आयपीएल सीजन सुरु होण्याआधी एका निर्णयाची सर्वाधिक चर्चा आहे. मुंबई इंडियन्सने आपला कॅप्टन बदललाय. त्यावरुन विविध मत, प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांना हा निर्णय पटलेला नाहीय. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाला वादग्रस्त म्हटल्यास हरकत नाही. कारण फ्रेंचायजीच्या लाखो समर्थकांनी आधीच आपली नाराजी व्यक्त केलीय. काही नावाजलेले माजी क्रिकेटपटूही कॅप्टन बदलण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याआधी हार्दिक पांड्या चहूबाजूंनी ट्रोल होतोय. रोहित शर्माला सगळ्यांची सहानुभूती मिळतेय. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची भूतकाळातील कामगिरी अशी आहे की, कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होण स्वाभाविक आहे. कारण रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावल आहे. आतापर्यंत अशी कामगिरी फक्त चेन्नई सुपर किंग्सलाच करता आलीय. MI आणि CSK या दोन फ्रेंचायजींच्या नावावरच सर्वाधिक पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावण्याचा रेकॉर्ड आहे.
खरतर मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप दरम्यान चार ते पाच सामन्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानावर येऊच शकला नाही. आता थेट तो आयपीएलमधून पुनरागमन करणार आहे. हा निर्णय अनेकांना पटलेला नाही. हार्दिक पांड्या देशासाठी, राज्यासाठी खेळत नाही. बरोबर आयपीएलच्यावेळी कसा फिट होतो? असा प्रश्न प्रवीण कुमारने विचारला. त्यात काही चूक आहे, असं नाहीय. कारण टीम इंडियाचा भविष्यातील कॅप्टन म्हणून हार्दिककडे पाहिलं जातं. पण फिटनेस हा त्याच्या मार्गातील अडथळा आहे. हार्दिकला आतापर्यंत बराच काळ दुखापतीमुळे मैदानापासून लांब रहाव लागलय. त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत त्याला टीकाकारांची तोंड बंद करावीच लागतील.
लोक बाहेर खूप काही बोलत होते, पण….
हार्दिक पांड्यासाठी टीका, ट्रोलिंग अजिबात नवीन नाहीय. आज हार्दिकच्या क्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कदाचित 2022 चा सीजन विसरले असतील. त्या आयपीएलमध्ये उतरण्याआधी हार्दिक अनफिट होता. बरेच महिने मैदानापासून दूर होता. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करु शकेल का? तो पुन्हा मैदानावर उतरणार का? असे अनेक प्रश्न होते. 2021 पासून पाठदुखीने त्याची चांगलीच पाठ काढलेली. पण हार्दिकने हार मानली नाही. त्याने स्वत:वर मेहनत घेतली. लोक बाहेर खूप काही बोलत होते, पण तो शांत राहून स्वत:वर मेहनत घेत होता. (sports news)
कमी लेखण्याची चूक नको
हार्दिक पांड्या 2022 च्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून उतरला. त्यावेळी या नवख्या संघाकडून कोणाला अपेक्षा नव्हती. फार काही करु शकणार नाही, असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. पण हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमने कमाल केली. गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलच विजेतेपद पटकावल. सलग दुसऱ्या सीजनमध्ये या टीमने फायनलमध्ये धडक मारली. अगदी अटीतटीच्या सामन्यात त्यांना CSK कडून पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाच म्हणजे कॅप्टन म्हणून हार्दिकने स्वत: पुढे राहून नेतृत्व केलं. अनेकदा टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. टीमला गरज असताना धावा केल्या, विकेट काढले. त्यामुळे हार्दिक पांड्याला कमी लेखण्याची चूक करु नका.
हार्दिक पांड्यामध्ये काय खास?
आज मुंबई इंडियन्ससारख्या मोठ्या, यशस्वी फ्रेंचाजयीच नेतृत्व हाती आलय. सहाजिक त्याच्यावर मोठा दबाव असेल. पण दबाव हाताळण्यासाठी मानसिक कणखरता लागते. ती हार्दिकमध्ये आहे. हे त्याने मागच्या दोन सीजनमध्ये दाखवून दिलय. मैदानावर त्याचा काहीवेळा संयम सुटतो. पण टीमच्या प्रत्येक प्लेयरकडून अपेक्षित कामगिरी करुन घेण्याच कौशल्य त्याच्याकडे आहे. त्यामुळेच गुजरात टायटन्सच्या टीममधील प्लेयर आज स्टार बनले आहेत.