पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक?
(sports news) इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने सरावाला सुरुवात केली आहे. कर्णधारपदाची नव्याने जबाबादरी सोपवण्यात आलेला हार्दिक पंड्याही या सराव शिबीरामध्ये सहभागी झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र आता अशाच एका व्हिडीओमुळे कर्णधार हार्दिक पंड्यावर टीका होताना दिसत आहे.
पंड्याचं वागणं चुकल्याचा दावा
हार्दिक पंड्याने काही दिवसांपूर्वीच अगदी पुजा करुन मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर हार्दिक पंड्याने नेट्समध्ये केलेली गोलंदाजी आणि फलंदाजीचे व्हिडीओ आणि फोटोही मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन शेअर करण्यात आले. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या लोळत लोळत मुंबई इंडियन्सच्या संघातील सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगासहीत इतर सहकाऱ्यांशी बोलत असल्याचं दिसत आहे. यावरुन सध्या चाहत्यांनी हार्दिक पंड्याची ही वागणूक बरोबर नसल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंड्या एका स्ट्रेचरवर लोळताना दिसत आहे. त्याच्या पायाच्या बाजूला मलिंगा आणि मुंबई इंडियन्सच्या संघातील इतर सहकारी उभे असून तो त्यांच्याशी काहीतरी बोलत असल्याचं दिसत आहे. हाच व्हिडीओ पोस्ट करत उमेश राणा नावाच्या आरसीबी समर्थकाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “श्री श्री 1008, जगातील सर्वश्रेष्ठ ऑल राउंडर, हार्दिक कोटि कोटि पंड्याचा हा व्हिडीओ पाहून प्रश्न असा निर्माण होतो की मुंबई इंडियन्सच्या लॉबीची वन फॅमेली थोडी घाबरणार की आनंद साजरा करणार? ही मोठी संकटात टाकणारी स्थिती आहे,” असं म्हटलं आहे. केवळ उमेश राणाच नाही तर इतरही अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हार्दिक पंड्याची वागणूक बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. “हार्दिक पंड्याबद्दल मला हीच गोष्ट आवडत नाही. त्याचा अॅटीट्यूड पाहा. तो मलिंगासारख्या महान क्रिकेटपटूसमोर असा वागतोय. त्याची बॉडी लाँग्वेज पाहा. फारच निराशाजनक आहे हे. मुंबई इंडियन्सने चुकीच्या माणसाची निवड केली आहे,” असं अन्य एकाने म्हटलं आहे.
मात्र काहींनी सांगितलं कारण
हार्दिकवर या व्हिडीओवरुन टीका होत असतानाच काहींनी त्याच्या पायाची मालिश केली जात असल्याने तो स्ट्रेचरवर पडून असल्याचा दावा केला आहे. पायाची मालिश सुरु असतानाच तो चर्चा करत असल्याचं हार्दिकच्या चाहत्यांचं म्हणणं असून हा कोणाचाही अवमान नाही असंही म्हटलंय. (sports news)
पंड्याने जिंकवून दिलं जेतेपद
हार्दिक पंड्याला मागील वर्षाच्या शेवटी आयपीएल ट्रेड विंडोमधील एक्सचेंजदरम्यान मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सकडून विकत घेतलं. हार्दिक पंड्या पूर्वी मुंबईकडूनच खेळायचा. मात्र गुजरातच्या संघाचं नेतृत्व करताना पहिल्याच पर्वात थेट जेतेदपद मिळवून देण्याचा कारनामा पांड्याने केला होता. मागील वर्षी म्हणजेच 2023 च्या पर्वात पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ उपविजेता राहिला. मात्र आता हार्दिकला मुंबईने संघात स्थान देतानाच रोहित शर्माकडून नेतृत्वाची धुरा काढून घेत हार्दिककडे सोपवली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.