टीम इंडियाच्या हेड कोचसाठी सचिन तेंडुलकरसह धोनीनेही भरला फॉर्म
अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. या पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. हे पद स्विकारण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी नकार दिलाय. तर दुसरीकडे एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरच्या नावाने बनावट अर्ज करण्यात आले आहेत.बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले होते. या पदासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीच्या नावानेही अर्ज करण्यात आले आहेत. बीसीसीआयला ३००० हून अधिक अर्ज आले असून, यात माजी क्रिकेटपटू आणि नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. मात्र बहुतांश अर्ज बनावटी असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज खेळाडूंनी अर्ज केले आहेत. बीसीसीआयने १३ मे रोजी अर्ज मागवले होते. हे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. बनावटी अर्ज येण्याची संख्या ही हजारांमध्ये जाऊन पोहोचली आहे.
मात्र बनावटी अर्ज येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बीसीसीआयने अर्ज मागवल्यानंतर अनेक बनावटी अर्ज केले गेले आहेत. गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवल्याने अर्जदारांची नावं ओळखणं सोपं जातं. त्यामुळे बीसीसीआय गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवते.
राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर संपला होता. मात्र बीसीसीआयने त्यांना टी-२० वर्ल्डकपपर्यंत थांबवण्याचा आग्रह केला होता. मात्र टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर ते पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरच भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल.