इचलकरंजीतील एसटी सरकार गँग एक वर्ष जिल्ह्यातून हद्दपार
विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील माजी नगरसेवक संजय तेलनाडे याच्यासह त्याच्या एसटी सरकार गँगला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तेलनाडे याच्यासह अरविंद सुकुमार मस्के (रा. अवधूत आखाडा), राकेश सुरेश कुंभार (रा. महादेव मंदिराजवळ), दीपक सतीश कोरे, इम्रान दस्तगीर कलावंत, आरिफ दस्तगीर कलावंत (तिघे रा. गावभाग) व अभिजित सुभाष जामदार (रा. नदीवेस नाका, सर्व रा. इचलकरंजी) या सातजणांचा कारवाईत समावेश आहे. तेलनाडे गँगवर केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी शहर व परिसरात संजय तेलनाडे याच्या एसटी सरकार या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, विनयभंग, गर्दी मारामारी, सरकारी नोकरावर हल्ले, फसवणूक, गंभीर स्वरुपाची दुखापत, मालमत्तेचे नुकसान, अवैध जुगार व्यवसाय आदी विविध गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी या टोळीवर मोकांतर्गत कारवाई झाली आहे. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गावभाग पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची नि:पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक यांची नियुक्ती केली होती. चौकशीअंती पुन्हा हा अहवाल पोलिस अधीक्षक पंडीत यांच्याकडे सादर करणयात आला होता.
चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळोवेळी हद्दपार प्राधिकारी तथा पोलिस अधीक्षक यांच्यासमक्ष घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी या टोळीतील सहभाग असणार्यांना आपली बाजू मांडण्यासाठी नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून पुरेशी संधी दिली होती. मात्र दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या सातजणांच्या विरोधात हद्दपारीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिले. एक वर्षासाठी या सातजणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती गावभागचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली. तेलनाडे टोळीवर झालेल्या हद्दपारीच्या कारवाईमुळे विशेषत: गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.