“बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा”

“तुम्हाला भाषण करायचे आहे, तर तुम्ही जरूर करा पण आम्हाला काम करू द्या. भाषण करून तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, आपली फक्त बदनामी होईल. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही. मराठी मराठी करता तर खरंच मराठीबाबात एवढं प्रेम असेल, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका”, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं”, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राज ठाकरेंच्या वक्तव्यांनंतर चांगलंच वातावरण पेटलेलं आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मनसे आणि भाजपावर टीका केली जात आहे.

भोंगा प्रकरणावरून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री म्हणाले की, “पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल. कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *