मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ आदेश

खिद्रापूर येथील तडे गेलेल्या प्राचीन कोपेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे जतन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सोमवारी येथील बैठकीत दिले. कोपेश्‍वर मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तत्काळ संरक्षणात्मक उपाययोजना राबवा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे वर्षांचे हे प्राचीन शिल्पवैभव जतन होण्याची आशा बळावली आहे.

सर्वप्रथम पुढाकार घेत खिद्रापूर शिल्प वैभव संकटात ही वृत्तमालिका 20 मार्चपासून प्रसिद्ध केली. ‘खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराला तडे; अद्भुत स्वर्ग मंडप कोसळण्याची भीती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच शासन खडबडून जागे झाले. शिरोळ मतदारसंघाचे आमदार आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोपेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 100 कोटींचा निधी आणणार, अशी घोषणा केली. त्यानंतरही सातत्याने कोपेश्‍वर मंदिराची दुरुस्ती करण्याचा विषय रेटून धरला आहे.

मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खिद्रापूर येथील कोपेश्‍वर मंदिर प्राचीन आणि पुरातन असून हे मंदिर कृष्णा नदीकाठावर असल्याने महापुराने वेढले जाते. वेगवेगळ्या कारणांमुळे मंदिराचे होणारे नुकसान रोखणे गरजेचे आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पुरातत्त्व विभाग व रस्ते विकास मंडळाच्या अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *