सांगली ‘कृषी उत्पन्‍न’चे संचालक बंडगर यांच्याकडे 10 लाखांची मागणी

सांगली कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे संचालक बाळू बंडगर यांच्याकडे संशयित फोंडे आणि टोळक्याने दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यांचा मुलगा संदीप याला काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने बाजार समिती कार्यालयातही धिंगाणा घातला. याबाबत बंडगर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सतीश फोंडे, सागर पारेकर, नवनाथ लवटे, दत्ता फोंडे, अक्षय चोपडे, युवराज बजबळे या सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते बाजार समितीच्या कार्यालयात संचालक अजित बनसोडे, कर्मचारी देवेंद्र करे, प्रशांत कदम यांच्यासोबत बोलत बसले होते. संशयित फोंडे हा त्यांचाच कार्यकर्ता आहे. तो इतर साथीदारांसह बाजार समितीत आला.सागर पारेकर म्हणाला, “बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीला उभे राहणार असाल तर दहा लाख रुपये द्या. पैसे दिले नाहीत तर निवडणुकीला उभे राहायचे नाही. अन्यथा मुलाला ठार मारेन”, अशी धमकी देऊन ते निघून गेले. बंडगर यांचा मुलगा संदीप हा हमालीचे काम करतो. सर्व संशयित तिथे गेले. त्यांनी संदीप याला लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. सागर हा हत्यार काढत असताना संदीप हा त्यांच्या तावडीतून सुटून बाजार समितीत पळून आला. त्यानंतर सर्व संशयित बाजार समितीत आले. त्यांनी कार्यालयाबाहेर दगडफेक केली. आवारातील कुंड्या फोडून नासधूस करीत दहशत निर्माण केली. संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *