सांगलीत चंद्रहार पाटील यांच्यासह अठरा जणांचे डिपॉझिट जप्त

सांगली लोकसभेचा मंगळवारी निकाल लागला. या निकालात 18 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, स्वाभिमानीचे महेश खराडे यांचा समावेश आहे. डिपॉझिट जप्त झाल्याने प्रशासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा होणार आहेत.

निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी उमेदवाराला ठराविक रक्कम ही डिपॉझिट म्हणून जमा करावी लागते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून अर्ज भरण्यासाठी 25 हजार रुपये आणि एसटी, एससी गटातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. त्यानुसार 20 उमेदवार डिपॉझिट भरून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

सांगली लोकसभेसाठी 18 लाख 68 हजार 174 मतदार आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष हजर राहून 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेसाठी 62.27 टक्के मतदान झाले. टपालातून 6 हजार 961 मतदान झाले. जिल्ह्यात प्रत्यक्ष आणि टपालातून असे एकूण 11 लाख 70 हजार 314 मतदान झाले.

डिपॉझिट जप्त होण्याचे सूत्र

निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीत एकूण मताच्या 16.66 टक्के मते मिळणे गरजेचे आहे. ही मते मिळविण्यात अयशस्वी झालेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. जिल्ह्यात 11 लाख 70 हजार 314 मतदान झाले होते. त्यामुळे 1 लाख 94 हजार 974 पेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

त्यानुसार जिल्ह्यात 18 जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. त्यामध्ये चंद्रहार सुभाष पाटील (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे), टिपू सुलतान सिकंदर (बहुजन समाज पार्टी), आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी), महेश यशवंत खराडे (स्वाभिमानी), पांडुरंग रावसाहेब भोसले (भारतीय जवान किसान पार्टी), सतीश लतिता कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), अजित धनाजी खंडादे (अपक्ष), अल्लाउद्दीन हयातचांद काजी (अपक्ष), डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (अपक्ष), जालिंधर मच्छिंद्र ठोमके (अपक्ष), तोहीद इलाही मोमीन (अपक्ष), दत्तात्रय पंडित पाटील (अपक्ष), नानासाो बाळासाो बंडगर (अपक्ष), रवींद्र चंदर सोलनकर (अपक्ष), शशिकांत गौतम देशमुख (अपक्ष), सुवर्णा सुधाकर गायकवाड (अपक्ष), संग्राम राजाराम मोरे (अपक्ष). प्रचारात अनेकांनी डिपॉझिट जप्त होण्याचा एकमेकांवर आरोपही केला होता. मात्र प्रत्यक्षात 18 जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *