सांगली : जिल्हा परिषद शाळेच्या ‘माझी भाकरी’ उपक्रमाने विद्यार्थ्यांची गळती थांबली
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त प्राथमिक शिक्षण दिले जाते हा शिक्का जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कुलाळवाडी या शाळेने पुसून टाकला आहे. स्थलांतरित कुटुंबामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही गळती थांबवण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या मुलांनाही भाकरी तयार करता याव्यात. यातून या मुलांच्या जेवणाचा प्रश्न मिटावा या हेतूने भाकरी बनवण्याच्या स्पर्धा कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेत आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या शाळेतील विद्यार्थी आत्मविश्वासपूर्वक आज भाकरी बनवू शकतो. या उपक्रमाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी देखील कौतुक केले होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्राथमिक शिक्षणाच्या दिशेन पडलेलं प्रत्येक पाऊल विकासाकडे घेऊन जाते. याच धारणेने जिल्हा परिषद शाळेने कुलाळवाडीत जलसंधारण, शैक्षणिक उठाव, गुणवत्ता वाढ उपक्रम, सामाजिक उपक्रमांमधील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या बळावर वृक्षारोपण व संवर्धन केले. यातून गावाच्या वैभवात भर पाडणारे वृक्ष आज मोठ्या जोमाने डोलू लागले आहेत. तसेच उसतोड मजुरांच्या मुलांनाही भाकरी तयार करता यावी यासाठी भाकरी करण्याचा सराव स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो. याचाच परिणाम आई-वडिलांबरोबर ऊसतोडीच्या वेळी मुलांचे होणारे स्थलांतर थांबले आणि शाळेतील मुलांची गळतीही कमी झाली. पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना स्वयंपाकाचे कौशल्य अवगत असावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या या शाळेने भाकरी बनवण्याच्या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.