सांगली : कोरोना मृत्यूच्या अनुदानावर डल्ला!

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यातील 2 हजार 53 व्यक्तींच्या नातेवाईकांनी एकाच व्यक्तीच्या नावे शासनाकडून मिळणारे 50 हजार अनुदान दोन वेळा घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. ही जादा दिलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील जिल्हाधिकारी व आपत्ती निवारण अधिकारी यांना काढलेले आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 31 अर्जदारांचा समावेश आहे. ही रक्कम परत न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी देशासह जगभरात कोरोना संसर्गाची मोठी लाट आली होती. या लाटेचा मोठा फटका सर्वांनाच बसला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी लॉकडाऊनदेखील करण्यात आले. या सार्‍यातून अर्थव्यवस्था ठप्प झाली होती.
कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 81 लाख 20 हजार रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी 1 लाख 48 हजार 336 लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 2 लाख 15 हजार 382 लोक आतापर्यंत पॉझिटिव्ह आले. तर त्यातील 7 हजारांवर रुग्ण दगावले. काही घरातील दोन – तीन रुग्ण दगावले. अडचणीत आलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना लेखी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या अर्जापैकी 5 हजार 84 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलकडे तक्रार निवारण समिती स्थापन केली होती. या तक्रार निवारण समितीमार्फत 889 अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच महापालिका क्षेत्रातील महापालिका तक्रार निवारण समितीकडे अर्ज केले होते. त्यापैकी 1 हजार 57 अर्ज मंजूर करण्यात आले. अशा एकूण 7 हजार 30 मयत रुग्णांच्या वारसांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामध्ये 31 मृत व्यक्तींच्या नावे दोन वेळा अनुदान घेतल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, राज्य प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. याचवेळी राज्यात एकूण 2 हजार 13 मयत व्यक्तींच्या नावे दोन वेळा हे अनुदान घेतल्याचे पुढे आले. त्याबाबतची चौकशी करण्यात आली. दोन वेळा घेतलेले अनुदानापैकी एक वेळचे अनुदान परत करण्यासंदर्भात महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील 31 पैकी 5 अर्जदारांनी ही रक्कम परत भरलेली आहे. तर अन्य 26 जणांच्या वारसांनी ती न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्यात येणार आहे. प्रशासनाने तसा इशारा दिला आहे.

अनेकांची अद्यापही प्रतीक्षाच
जिल्ह्यात 7 हजार 30 मयत व्यक्तींच्या वारसांना 50 हजार अनुदान मंजूर झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र अद्यापही अनेक अर्जदारांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. आधार लिंक, बँक खाते क्रमांक आदी बाबींची पूर्तता नसल्याच्या कारणातून अनुदान थांबवण्यात आले आहे. तर या प्रकरणातील कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांचे मात्र शासनदरबारी हेलपाटे सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *