राज्यासाठी दिलासादायक बातमी
ओमायक्रॉनमुळे वाढत असलेल्या रुग्णसंख्येचा (corona cases) फैलाव कमी होत असून, आता राज्यातही उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसते. सार्वजनिक आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर या पाच जिल्ह्यांमधील एकत्रित उपचाराधीन रुग्णसंख्या पाहिली असता, त्यात १० टक्क्यांनी घट दिसून येते. मात्र, नागपूर आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. नागपूरमध्ये ही वाढ २०२.६२ टक्के, तर पुण्यात ११०.६८ टक्के असल्याचे दिसून येते. अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये किंचित घट झाल्याचे दिसून येते.
दुसऱ्या लाटेच्या वेळी ही रुग्णसंख्या मोठी होती. ९ जानेवारीला गंभीर रुग्ण २.९७ टक्के होते. त्यापैकी ०.८८ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. १२ जानेवारीला हे प्रमाण २.३४ टक्के इतके होते त्यापैकी ०.८४ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. १६ जानेवारी रोजी ०.८६ तर १८ जानेवारी रोजी ०.९१ टक्के रुग्णांना (corona cases) अतिदक्षता विभागाची गरज लागल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.
राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर हा २३.४८ टक्के असला तरीही रायगड, नाशिक, पुणे, अकोला, नांदेड, वर्धा, ठाणे नागपूर, सांगली आणि सिंधुदुर्ग येथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटिचा दर हा त्यापेक्षा अधिक असल्याचा दिसतो.नाशिक, पुणे, रायगड, अकोला येथे हा दर ३० ते ३८ टक्के असून ठाणे, नागपूर, नांदेड येथे तो पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे.मुंबईमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा हा दर कमी आहे. कोल्हापूर, सोलापूर सातारा, लातूर, नंदुरबार, धुळे, चंद्रपूर येथे हा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असून, तो १८ ते २३ टक्क्यांच्या मध्ये असल्याचे दिसून येते.