कोल्हापूर-सांगली मार्ग खड्ड्यांतच!

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर-सांगली मार्गाची बकाल अवस्था होऊनही जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला गांभीर्य नाही. जीवघेण्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे का? जागोजागी खोलवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शेकडो आलिशान मोटारींचे प्रचंड नुकसान होत आहे. दुचाकी वाहनांचा खुळखुळा झाला आहे, तर नित्य प्रवास करणार्‍यांची हाडे खिळखिळी होत आहेत. कंबरदुखीने तर सारेच त्रस्त आहेत. वाहनधारकांतून संताप व्यक्त होत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त आहे.

ऐन पावसाळ्यात केलेले जुजबी पॅचवर्क उखडून खड्ड्यांचा आकार आणखी वाढत चालला आहे. रस्त्यांच्या मध्यवर्ती खोलवर खड्ड्यांसह अरूंद चरीमुळे कोल्हापूर-सांगली मार्गावर दररोज छोट्या- मोठ्या अपघातांच्या किमान दहा ते पंधरा घटना घडताहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज पाडवा यादिवशी मार्गावर अपघाताचे सत्रच सुरू होते. रस्त्याच्या मलमपट्टीचा देखावा अनेक वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे.

रस्ता कुठला… हा तर मृत्यूचा सापळाच!साक्षात मृत्यूचा सापळा ठरलेल्या या महामार्गावर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली या 55 ते 60 किलोमीटर अंतराच्या मार्गावर किमान हजारांवर खड्डे पडल्याचे दिसून येतात. तीन महिन्यांपूर्वी जी स्थिती होती, त्याच अवस्थेतून वाहनधारकांना कसरत करीत दोन जिल्ह्यांदरम्यानचा प्रवास करावा लागतो आहे.

निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतरही यंत्रणा सुस्त

खड्ड्यांतील मोठमोठे दगडी खडे उडून पादचारी, स्टॉलधारक व दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रकारही वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून उडालेला दगड लागून अंकली (ता. मिरज) येथील 18 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला होता. निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे डोळे उघडले नाहीत.

खोलवर खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास

सांगली फाटा, चिपरी फाटा, चौंडेश्वरी सूतगिरणी चौक, शिवाय जयसिंगपूर-अंकली फाटा दरम्यानचा मार्गही खड्ड्यांमुळे धोकादायक असून, प्रवास जीवघेणा ठरत आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर चारचाकींसह रात्र-दिवस अवजड वाहनांची रहदारी असते. दुचाकीवरून प्रवास करणार्‍यांची संख्याही मोठी आहे.

टायर फुटून दुर्घटना

कोल्हापूर-सांगली मार्गावरील अगणित खोलवर खड्डे, अरुंद चरीमुळे शेकडो आलिशान मोटारी, अगणित दुचाकी वाहनांचा खुळखुळा झाला आहे. खोलवर खड्ड्यांत वाहने आदळून डिक्स आऊट, सस्पेन्स खराब होणे, टायर फुटून वाहने रस्त्यावर उलटणे अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत.

प्रवास जीवघेणा!

अलिशान मोटारींचे स्पेअरपार्ट महागडे असल्याने दुरूस्तीवर मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. शिवाय जोरदार धक्क्यामुळे वाहनधारक, प्रवास करणार्‍यांची हाडेही खिळखिळी होवू लागली आहेत. कोल्हापूर-सांगलीचा प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर-सांगली मार्गासाठी राज्य, केंद्राकडे पाठपुरावा : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर-सांगली मार्गाची झालेली दुरवस्था गंभीर, जीवघेणी ठरणारी आहे. रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय दळणवळण व रस्ते सुधारणामंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मंत्री गडकरी यांनी या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची नवी दिल्ली येथे बैठक घेऊन रस्त्याचा तातडीने सर्व्हे करण्याचा आदेश दिला आहे. आज, मंगळवारपासूनच त्याची कार्यवाही होत आहे. कोल्हापूर-सांगली मार्गाच्या सुधारणेसाठी निश्चित पाठपुरावा राहील, असे खासदार धैर्यशील माने यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *