मिरजेत एका रात्रीत दुकाने जमीनदोस्त
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी दुकाने शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने मध्यरात्री चार जेसीबींच्या साह्याने जमीनदोस्त केली. यामध्ये एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी विशाल दिलीपराव सन्मुख यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 ते 150 जनांविरुद्ध मिरज शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दुकाने आणि त्यांच्या पाठीमागे काही लोक राहण्यास आहेत. ही जागा ब्रह्मानंद पडळकर यांची असल्याचे सांगण्यात येते. पडळकर यांनी संबंधित दुकानदारांना जागा रिकामी करण्यास यापूर्वी अनेकवेळा सांगितले होते. परंतु त्यांनी ती रिकामी केली नव्हती. त्यामुळे ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने मिरजेत (शनिवार) मध्यरात्री दाखल होत अचानक दुकाने पाडण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानदार व झोपडपट्टीधारक व पडळकर यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामध्ये मोहम्मद लियाकत सय्यद हा जखमी झाला.
दुकाने पाडल्यानंतर पडळकर समर्थकांनी झोपडपट्टी पाडण्याकडे आपला मोर्चा मिळविला. परंतु झोपडपट्टी धारकांनी पडळकर समर्थकांवर जोरदार दगडफेक केली. तसेच जेसीबी आणि पडळकर समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले. दरम्यान यामध्ये एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, झोपडपट्टीधारक व दुकानधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पडळकर समर्थकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.