सांगली शहर आणि परिसरात परप्रांतीय मुलींची तस्करी!
सांगली शहर आणि परिसरात वेश्या व्यवसायासाठी नेपाळ, बांग्लादेश, पश्चिम बंगाल व कर्नाटकमधील मुलींची तस्करी (smuggling) होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या मुलींना छोटी-मोठी नोकरी किंवा घरकामासाठी म्हणून तेथून आणले जाते. प्रत्यक्षात या मुलींचा वेश्या व्यवसायासाठी सौदा केला जात आहे. स्थानिक दलाल व एजंटांची मोठी साखळीच यामध्ये सक्रिय आहे. या सगळ्या प्रकारात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही स्पष्ट होत आहे.
कर्नाटकातील परंपरा बंद
सांगलीत गोकुळनगर व प्रेमनगर येथे पूर्वी कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील मुलींना वेश्या व्यवसायासाठी विकले जात होते. मुलगी वयात आली की सांगली, मिरजेतील दलाल महिला व एजंटांची संपर्क करून त्यांचा सौदा केला जात होता. मात्र गेल्या पाच-दहा वर्षांत कर्नाटकातील ही परंपरा आता बंद झाली आहे. तेथील मुली येथे वेश्या व्यवसायासाठी आणण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे.
तस्करीचा धंदा फोफावला
नेपाळ, बांग्लादेश व पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, याची अनेकांना भ्रांत असते. त्यांच्या या परिस्थितीचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील दलाल व एजंट आजपर्यंत घेत आले आहेत. नेपाळ, बांग्लादेश व पश्चिम बंगालमधील एजंटांशी लागेबांधे ठेऊन तेथील मुलींचा एकप्रकारे सौदाच करण्यात येत आहे. मुलींना घरकामासाठी नेतो, असे आई-वडिलांना सांगितले जाते. मुलींचा पासपोर्ट काढला जातो. त्यानंतर त्यांना भारतात आणले जाते. तेथून मग त्यांना कोणत्या जिल्ह्यात न्यायचे, हे ठरविले जाते.
भाषेचा प्रश्न, असहाय्यता
प्रत्यक्षात ज्यावेळी मुलींना ‘रेड लाईट’ एरियात आणले (smuggling) जाते, तेव्हा त्यांना तेथील चित्र पाहून त्या हादरून जातात; मात्र असहाय्य असतात. भाषेचा मोठा प्रश्न असतो. मराठी व हिंदीही बोलता येत नाही. घरदार सोडले असल्याने पोटा पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी त्यांना देहविक्री करण्याशिवाय पर्याय रहात नाही.
सांगलीत अनेक परप्रांतीय मुली
सांगलीत नेपाळ, बांग्लादेश व पश्चिम बंगालमधील अनेक मुली वेश्या व्यवसाय करीत आहेत. या मुली अल्पवयीन नाहीत, असा दावा त्यांच्या घरमालकिणी करतात. मुलींना दरमहा केवळ पगार दिला जातो. दररोज जो काही व्यवसाय होईल, तो सारा पैसा घरमालकिण व एजंटांच्या खिशात जातो. या मुलींना जास्तीत जास्त एक वर्षे ते सव्वावर्षेच येथे ठेवले जाते. कालांतराने त्यांना दुसऱ्या शहरात नेले जाते.
पोलिसांशी लागेबांधे
घरमालकिणी व एजंटाचे स्थानिक पोलिसांशी लागेबांधे जडले आहेत. परराज्यातील मुलगी येथे वेश्याव्यवसायासाठी आली कशी, याची पोलिसांनी चौकशी करण्याची आवश्यकता आहे, पण ती होत नाही. ‘चिरीमिरी’साठी काही पोलिसांनीही लाज सोडली असल्याचे हे बुधवारी पोलिस हवालदार स्वप्निल कोळी याच्या कृत्यावरून दिसून आले. सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मदत केल्यामुळे एका पीडित मुलीची तेथून सुटका झाली आहे, पण अशा अजून किती मुली इथे खितपत पडल्या आहेत, त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
‘रक्षक’ बनला ‘भक्षक’!
वेश्या व्यवसाय करणाऱ्या अल्पवयीन बंगालमधील मुलीला दमदाट विश्रामबागचा पोलिस स्वप्निल कोळी याने बलात्कार केला. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने कारवाईचा इशारा देत सात लाख रुपयांची खंडणी वसुली करून हा ‘रक्षक’च ‘भक्षक’ बनला. वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी असल्याने त्याने हे धाडस केले असल्याची चर्चा आहे. आता वरिष्ठांचीही चौकशी होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
विश्रामबाग पोलिसांनी तपास गुंडाळले
गेल्या दोन वर्षांत गोकुळनगर व प्रेमनगर येथे पश्चिम बंगाल, तसेच बांग्लादेश व नेपाळमधील अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्याची कारवाई अनेकदा झाली. स्थानिक दलाल महिला व परदेशातील एजंटाची नावे निष्पन्न झाली. एक- दोघांना अटक करण्यापुढे पोलिसांचा तपास पुढे सरकलाच नाही. काही सुगावा लागत नसल्याचा कांगावा करीत पोलिसांनी तपास गुंडाळले. परिणामी आजही मुलींची तस्करी जोमात सुरू आहे.