राज्यात कॉपी सत्र थांबेना! बारावीचा बायोलॉजीचा पेपर, विद्यार्थ्यांवर कारवाई
सध्या राज्यभरात बारावीच्या परीक्षा (exam) सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी वेगळंच चित्र पहायला मिळाले. नांदेडमधील एका परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बुधवारी 8 मार्चला बारावीचा बायोलॉजीचा पेपर होता. या पेपरला कॉपी केल्याप्रकरणी 29 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पुणे विभागीय मंडळात सर्वाधिक म्हणजे तब्बल 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच यासोबतच दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या 8 जणांना पकडण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली.
राज्यात कॉपी सत्र थांबेना –
सध्या 12 वीच्या परीक्षा (exam) सुरू असून पहिल्या दिवसापासून राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापलं गेलं होतं. तर बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. बुधवारीही बायोलॉजीच्या परीक्षेदरम्यान 29 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यापूर्वी फिजिक्स पेपरला 50 तर केमिस्ट्रीच्या पेपरला 46 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते.
तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. मुलांना कॉपी देण्यासाठी आतमध्ये सोडत नसल्याने हा वाद झाला. तसेच इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही, असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर उघडपणे कॉपी सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.