कोल्हापूर प्रभाग रचना राजकीय दबावातून?
(political news) कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी (दि. 1) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध होणार आहे. ताराबाई पार्कातील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयासह शहरातील चार विभागीय कार्यालयांतही प्रभाग रचनांच्या भौगोलिक सीमा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत.
वेबसाईटवरही प्रभाग रचना
प्रारूप प्रभाग रचनेचे प्रभाग क्र. 1 ते 31 चे नकाशे व सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा पीडीएफ स्वरूपात महापालिकेच्या www.kolhapurcorporation.gov. या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याबरोबरच गांधी मैदान विभागीय कार्यालय (क्र. 1) अंतर्गत कै. बाळासाहेब ग. खराडे पॅव्हेलियन हॉल, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 2) अंतर्गत केशवराव भोसले नाट्यगृह, राजारामपुरी विभागीय कार्यालय (क्र. 3) अंतर्गत राजारामपुरी 1 ली गल्ली जगदाळे हॉल, छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय (क्र. 4) अंतर्गत विवेकानंद कॉलेजजवळील, नागाळा पार्क हॉल व ताराबाई गार्डन, सासने ग्राऊंडसमोर मुख्य निवडणूक कार्यालय येथे निवडणूक कार्यालयात प्रभाग रचना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
सुट्टीच्या दिवशीही सूचना, हरकती
प्रारूप प्रभाग रचना निश्चित केलेल्या ठिकाणी 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत (सुट्टीच्या दिवसासह) कार्यालयीन सूचना व हरकती सासने ग्राऊंड, ताराबाई पार्क मुख्य निवडणूक कार्यालय येथे स्वीकारण्यात येणार आहेत. हरकती व सूचनांसाठी अर्जदारांनी लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जावर नाव, संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हरकती व सूचना दाखल करणार्या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे आवाहन उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (political news)
इच्छुकांत प्रचंड उत्सुकता
15 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिका सभागृहाची मुदत संपली. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. आता पुन्हा महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नवीन आहे. कालावधी संपल्यानंतर वर्ष-सव्वा वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने प्रारूप प्रभाग रचनेविषयी इच्छुक उमेदवारांत प्रचंड उत्सुकता आहे.
प्रभाग रचना राजकीय दबावातून?
निवडणूक कामकाजाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ दर्जाच्या एका अधिकार्याने राजकीय दबावातून मोठ्या प्रमाणात प्रारूप प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरू आहे. माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांना संबंधित अधिकार्याने थेट मोबाईलवरच ‘तुमचा प्रभाग असा असा आहे… या या गल्ल्या आहेत… तयारीला लागा…’ असे सांगितल्याचे काही पदाधिकार्यांनी महापालिकेत पत्रकारांना सांगितले.