विजयाच्या क्षणी पी. एन. पाटील यांची उणीव भासते : शाहू महाराज
लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी करवीर विधानसभा मतदारसंघतसेच जिल्ह्यातल्या कानाकोपर्यात प्रचार सभा आणि नियोजन बैठका घेऊन मला विजयापर्यंत स्व. पी. एन. पाटील यांनी पोहोचविले. आज विजयाच्या क्षणी ते आपल्यात नाहीत, त्यांची उणीव भासते, अशा शब्दांत नूतन खासदार शाहू महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. MLA PN Patil
खासदार झाल्यानंतर प्रथमच बुधवारी सायंकाळी शाहू महाराज यांनी राजारामपुरी येथील पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील, राजेश पाटील यांच्याशी शाहू महाराज यांनी चर्चा केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, अर्जुन माने उपस्थित होते. MLA PN Patil
पी. एन. पाटील यांचे असणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू
करवीर मतदारसंघातून सर्वाधिक मतदान शाहू महाराजांना झाले पाहिजे, असे पी. एन. पाटील प्रचार सभांमध्ये सांगत होते. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. केवळ करवीरच नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मतदारसंघातही त्यांनी प्रचार केला. माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आयुष्यभर सांभाळलेली काँग्रेसची निष्ठा आणि कार्यकर्त्यांना दिलेले प्रेम कौतुकास्पद असून, कार्यकर्त्यांना तसेच प्रेम देऊ. करवीर मतदारसंघाच्या विकासासाठी पी. एन. पाटील यांचे असणारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही शाहू महाराज यांनी दिली. MLA PN Patil
पी. एन. पाटील, सतेज पाटील यांचे योगदान
उमेदवारी मिळविण्यापासून ते निवडणुकीतील विजयापर्यंत शाहू महाराज यांच्यासाठी दिवंगत आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांनी पायाला अक्षरशः भिंगरी बांधली होती. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या नात्याने सतेज पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघ ढवळून काढला. निवडणुकीसाठी ज्या काही जोडण्या कराव्या लागतात त्या केल्या. विनायक पाटील, स्वाती कोरी, नंदाताई बाभुळकर, ए. वाय. पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रिय केले.
पी. एन. पाटील यांनी तर आपण स्वतःच उमेदवार असल्याचे समजून रात्रीचा दिवस केला. मतदारसंघातील गाव, वस्त्या व वाड्या पिंजून काढल्या. संपूर्ण पाटील कुटुंबीय प्रचारात गुंतले होते. शाहू महाराज यांच्या विजयात पी. एन. पाटील व सतेज पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. मतदान झाल्यानंतर काही दिवसांतच पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे शाहू महाराजांच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना अनेक कार्यकर्ते पी. एन. पाटील यांची आठवण काढून भावुक होत होते. पी. एन. पाटील आणि सतेज पाटील या काँग्रेसच्या दोन्ही दिग्गज नेत्यांनी शाहू महाराजांचा विजय अधिकच सोपा केला. पी. एन. पाटील यांच्या करवीर मतदारसंघातून तर शाहू महाराज यांना तब्बल ७१ हजारांहून अधिकचे मताधिक्य शाहू महाराजांच्या पारड्यात पडले.