सांगलीत शहरात तणाव; पोलिस बंदोबस्त वाढवला

येथील राम मंदिर चौकात श्रीराम रिक्षा मंडळाच्या थांब्यावरील एका प्रतिमेचे पोस्टर फाडल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. या घटनेनंतर रिक्षा मंडळाचे पदाधिकारी तसेच काही कार्यकर्ते राम मंदिर चौकात जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. काही वेळानंतर तो निवळला. या घटनेनंतर शहरात पोलिस (police) बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

शहर तसेच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फाडलेले पोस्टर ताब्यात घेतले. रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, राम मंदिर चौकात लावलेली तसेच व्यापार्‍यांच्या दुकानासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या अनुषंगाने जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

या चौकात खूप वर्षांपासून राम मंदिर आहे. त्याला लागूनच श्रीराम रिक्षा मंडळाचा थांबा असून त्यास लागून छत आहे. यामध्ये असलेल्या दोन सिमेंटच्या बाकड्याला लागून रिक्षा मंडळाचा फलक आहे. फलकावर पोस्टर लावले होते. ते अज्ञातांनी फाडल्याचे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास उघड झाले. यानंतर शहर व विश्रामबाग पोलिसांची (police) पथके तातडीने दाखल झाली. रिक्षा मंडळाचे पदाधिकारी अभिषेक चव्हाण, अनिल चव्हाण, अनिल दळवी, गजानन कुंभार, शंकर मजगे, अभिजित चव्हाण, रफीक मुलाणी, महेश पालखे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, पोस्टर फाडणार्‍या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. डॉ. तेली यांनी लवकरच या घटनेचा छडा लाऊन संशयितास जेरबंद केले जाईल, अशी ग्वाही दिली.

बंदोबस्त वाढविला!

राम मंदिर चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा चालकांनी त्यांचा व्यवसाय पूर्ववत सुरू केला होता. रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी फलकावर नव्याने पोस्टर लावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित दिसतात, मात्र रात्रीची वेळ असल्याने फुटेज स्पष्ट दिसत नाही. कदाचित हा प्रकार रात्रीच्यावेळी घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *