दंगल चित्रपटातील कथा वाटावी अशीच घटना घडली सांगली जिल्ह्यात

महाराष्ट्राच्या लाल मातीत अनेक दिग्गज मल्ल तयार झाले. काही कुस्ती (wrestling) शौकीन आपल्या मुलांना तगडा मल्ल बनवण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसतात. अगदी आमिर खानच्या दंगल चित्रपटातील कथा वाटावी अशीच घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी वांगीच्या होनमाने बंधूंनी थेट घरातच तालीम सुरू केली.

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला. त्यामुळे अनेक मुलं खेळण्या-बागडण्याच्या वयात मोबाईलमध्ये गुंतून गेली. लॉकडाऊनमुळं बाहेर पडणं शक्य नव्हतं. या काळात मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी वांगीतील रामचंद्र आणि राहुल होनमाने या बंधूंनी थेट घरातच तालीम सुरू केली.

जुन्या घरात लाल माती टाकून घेतली. 20 फूट लांब आणि 14 फूट रुंदीचा आखाडा तयार केला आणि मुलांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. होनमाने बंधूंनी स्वत:च्या 4 मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी तालीम सुरू केली. पण त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी अमोल पवार या अनुभवी वस्तादांची नेमणूक केली.

आता या तालमीत होनमाने यांच्या 4 मुलांसोबत गावातील 30 ते 35 मुलं-मली प्रशिक्षण घेत आहेत. अमोल पवार हे कुस्तीतील विविध डाव, प्रतिडाव या मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे गावोगावच्या मैदानांत या तालमीतील पैलवानांचा दबदबा आहे.

होनमाने यांनी एक लाख रुपयांच्या खर्चातून तालमीसाठी मॅट आणले. हे मॅट 25 फूट लांब आणि 25 फूट रुंद आहे. त्यामुळे आता वांगीतील मुला-मुलींना गावातच मॅटवर कुस्तीचे (wrestling) धडे गिरवण्याची संधी मिळाली आहे.

कडेगाव तालुक्यातील वांगी गावाला पूर्वापार कुस्तीची परंपरा आहे. परंतु, गेल्या काही काळात ही परंपरा लोप पावत असल्याची चिन्हे होती. होनमाने यांच्या तालमीमुळे वांगीतील कुस्ती पुनर्जिवित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *