मिरजेच्या रक्तचंदनाचे सातार्‍यापर्यंत धागेदोरे

मिरज, जि. सांगली येथे मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पोलिसांनी तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त केले आहे. या प्रकरणात ट्विस्ट आला असून या रक्तचंदनाचा सातार्‍यातील ग्राहकाला पुरवठा करण्यात येणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिल्याने हे रक्तचंदन सातार्‍यात कोणाकडे जाणार होते? असा सवाल उपस्थित होत असून पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली आहेत.
सांगलीत रक्तचंदन पकडल्यानंतर याची लिंक बेंगलोरपर्यंत असल्यचे स्पष्ट झाले असून एकाला अटकही करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर संशयिताने हा माल कोल्हापूरला जाणार असल्याचे प्रथम सांगितले. परंतु, खोलवर तपास केल्यानंतर पोलिसांना हा माल सातार्‍याला जात असल्याचा संशय आहे.
त्यादृष्टीने पोलिसांची बेंगलोर व सातार्‍यात पथके रवाना करण्यात आली आहेत. बेंगलोरमार्गे मिरज व्हाया सातारा असे हे रक्तचंदन येणार होते का? सातार्‍यात नेमका कुणाला पुरवठा होणार होता? असे प्रश्न यानिमित्ताने पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी वन विभागाने व्यापक मोहीम राबवत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चंदन चोर व प्राण्यांचे अवयव बाळगणार्‍यांवर एकाचवेळी धाड टाकली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच महत्व आहे.आता सांगली पोलिसांनी थेट बेंगलोरमधून येणारे रक्तचंदन पकडल्याने पुन्हा सातार्‍यातील धाड प्रकरणाने उचल खाल्ली आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईत सातार्‍यात दोन दुकानांमधून चंदनाचा साठा जप्त केला होता. त्यामुळे ज्यांच्याकडे चंदन सापडले त्यांनाच तर या रक्तचंदनाचा पुरवठा होणार होता का? असाही सवाल उपस्थित होत आहे. रक्तचंदनाचे सातार्‍यापर्यंत कनेक्शन आल्याने सातारा पोलिस आणि वन विभाग सतर्क झाला आहे.
मिरजेतून येणारे रक्तचंदन हे सातार्‍यातील एकाला देण्यात येणार होते. त्यादृष्टीने सांगली पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. यामध्ये वन विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून यापूर्वीचा डाटा व चंदन तस्करांकडून मिळालेल्या माहितीचे अ‍ॅनालिसीस करून चंदन घेणार्‍याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यामध्ये सातार्‍यातील समावेश असलेल्या व्यक्तींचा पर्दाफाश व्हायचा असेल तर वन विभागाचे उपवनसंरक्षकांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *