“आम्हाला वगेळी भूमिका घ्यायला लावू नका”
(political news) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आजपासून मराठा आंदोलक गावोगावी उपोषण करणार आहेत. तर मनोज जरांगे यांचीही प्रकृती खालावली आहे. आरक्षणावर कोणताच तोडगा निघताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार काय? असा संतप्त सवाल करतानाच आम्हाला वगेळी भूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला. खासदार संजय राऊत यांनी हे पत्रक वाचून दाखवलं.
संजय राऊत हे दौंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे पत्रक वाचून दाखवलं. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्रातील सामाजिक एकतेला हे सरकार चूड लावत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. ते हक्क त्यांना मिळायलाच हवे. ओबीसी आणि आदिवसींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
टिकणारं आरक्षण हवंच
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं, त्यासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. फक्त योग्यवेळी आरक्षण देऊ ही त्यांची भाषा आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर हे सरकार आरक्षणाचा जीआर ठेवणार आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (political news)
मोदी, शाह यांच्याशी बोला
सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचं मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवावेत आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या आत्महत्या थांबवाव्यात यासाठी सरकार कोणतीही पावलं टाकताना दिसत नाही. पाटील यांचे प्राण वाचावेत हेच आमचं म्हणणं आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. शिवसेना फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, असा इशाराच त्यांनी दिला.
आमची भूमिका पोषक
तर, उद्धव ठाकरे आणि माझा सातत्याने संपर्क सुरू आहे. सकाळपासून मी त्यासाठीच बसलोय. उद्धव ठाकरे हे माझ्या संपर्कात आहेत. मराठा आंदोलनाला समर्थनाची आणि पोषक आमची भूमिका आहे. ती तशीच राहील, असं संजय राऊत म्हणाले.
ते मराठा कार्यकर्ते नसावेत
दौंडमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कार्यकर्त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. आम्ही मराठा आंदोलकांच्या सोबत आहोत. त्यांच्यासोबत युद्धात उतरलो आहोत. आम्ही राजकारण करत नाही. कुणाला राजकारण करायचं असेल, तर ते मराठा समाजाशीं करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे, असंही राऊत म्हणाले.
घोषणा देणारे मराठा समाजातील कार्यकर्ते असावेत असं वाटत नाही. लोकशाहीत अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आम्ही जरांगे सोबतच्या प्रवाहात आहोत, असंही ते म्हणाले.