“भाजपची मदतच करायची असेल तर उघडपणे करा”
(political news) मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबपर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाष्य केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला भाजपची मदत करायची असेल तर उघडपणे करा असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागून कोण बोलत आहे हे कालांतराने कळेल, असे राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला गेला असे राज ठाकरे म्हणाले होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचं मी 1999 नंतर ठाण्यात सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही,” असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. (political news)
सुषमा अंधारेंची टीका
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांसोबत बोलताना सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. “आपल्याला वाटेल तेव्हा कधीही उठावं आणि विधानं करावीत. अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांवर फार बोलू नये. पण, भाजपाची मदत करायची, असेल तर उघडपणे करावी. आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.