लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

(political news) लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष ताकदीने तयारीला लागले आहेत. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करते आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेत तर चला आम्ही तुमच्याबरोबर येतो म्हटलं आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

सगळी फसवाफसवी सुरु आहे
पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक शो होता हसवाफसवी. आता मोदींचा खेळ सुरु आहे फसवाफसवी. वेगवेगळी रुपं घेऊन नरेंद्र मोदी येतात. मेरा और आपका पुराना रिश्ता हैं वगैरे सांगतात. दोनवेळा आमची फसगत झाली. शिवसेना भाजपाची युती २५ वर्षे होती. पण मोदींच्या भुलथापांना आम्हीही भुललो होतो. आमच्या पदरात काय पडलं? धोंडे पडले असते तर ठिक होतं. त्यांना शेंदूर फासला तर देव तरी होतो. यांचं काय? मागच्या दहा वर्षांत फक्त नामांतरं झाली आहेत. योजनांची नावं बदला, स्टेशन्सची नावं बदला, शहरांचं नाव बदला एवढंच चाललं आहे. नुसतं योजना किंवा गावांचं नाव बदलत नाही. यांनी जुमल्यांचं नावही गॅरंटी केलं आहे. अच्छे दिन, १५ लाख रुपये अकाऊंटमध्ये आले, काळं धन परत आलं नाही.. हे सगळे जुमले होते. तुम्ही कितीही पैसे खा आणि भाजपात या तुम्हाला काही होणार नाही ही हल्लीची मोदी गॅरंटी आहे. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

साधारण आठ एक वर्षांपूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितलं होतं. ५० हजार कोटींमुळे बिहारचं काही होणार नाही असं मोदी म्हटलं होतं. असं करत करत सव्वा लाख कोटींचं पॅकेज मोदींनी जाहीर केलं होतं. या गोष्टीला आठ वर्षे झाली. आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळाले का? बिहारच्या जनतेला जर सव्वा लाख कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्याबरोबर येतो. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. (political news)

गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही?

साधी गोष्ट सांगतो भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली. या यादीत कुणाची नावं आहेत? मोदी-शाह यांची नावं आहेत. आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह नावं माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर आले ते नितीन गडकरी होते. युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने आरोप केले होते. कृपाशंकर सिंह त्याचं नाव पहिल्या यादीत आहे पण गडकरींचं नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपाची जाहिरात होती ना.. आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय? हा माझा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मागच्या वेळी युतीने ४२ खासदार आले नसते तर दिल्लीचं तख्त राहिलं नसतं. महाराष्ट्र गीतात म्हटलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आधी दिल्लीचं तख्त फोडावं लागेल आणि मग आपलं तख्त तिथे निर्माण करावं लागेल. यांची जी काही मिजास आहे अब की बार ४०० पार मी म्हणतो अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *