बचत खात्यात मर्यादेपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केले तर याल टॅक्स विभागाच्या रडारवर
देशातील बहुतांश लोकांचे बँक खाते आहे ज्याद्वारे लोक बहुतांश आर्थिक व्यवहार करत. यापैकी बहुतेकांना खात्यात किमान किती शिल्लक ठेवायचे याबाबत माहित आहे परंतु, बँक खात्याशी संबंधित असे डझनभर नियम आहेत ज्याबद्दल ग्राहकांना माहिती असणे आवश्यक आहे. खात्यात रोख रक्कम (Cash amount) जमा करण्याची कमाल मर्यादा, एटीएम-डेबिट कार्डचे शुल्क, चेकचे शुल्क… इत्यादी अनेक गोष्टींची माहिती असली पाहिजे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) या सर्व गोष्टींबाबत तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
बँक अकाउंटमध्ये जास्तीत जात किती रक्कम ठेवायची त्यापूर्वी लक्षात घ्या की कोणत्याही परिस्थितीत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागते. किमान रक्कम नसल्यास बँका दंड आकारतात. वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या स्वतःच्या किमान शिल्लक मर्यादा निश्चित केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये किमान शिल्लक मर्यादा रुपये एक हजार रुपये आणि इतरांमध्ये १० हजार रुपयेपर्यत आहे.
सेव्हिंग अकाउंटमध्ये कॅश जमा करायची मर्यादा
बचत खात्यांमध्ये रोखीने पैसे जमा करण्याचीही मर्यादा असते. आयकर नियमांनुसार, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात बचत खात्यात जास्तीत जास्त १० लाख रुपये रोख म्हणजे कॅश जमा करू शकते. तसेच यापेक्षा जास्त कॅश रक्कम जमा केल्यास बँकांना त्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. यासोबतच तुम्ही खात्यात ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करता तेव्हा तुम्हाला पॅन क्रमांकही द्यावा लागतो. तुम्ही एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत रोख (Cash amount) जमा करू शकता. तसेच, खात्यात नियमितपणे रोख जमा करत नसल्यास ही मर्यादा २.५० लाख रुपयांपर्यंत वाढू शकते.
दहा लाखांची मर्यादा!
जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये १० लाखाच्या मर्यादेपेक्षा जास्त कॅश जमा केली आणि आयकर रिटर्नमध्ये स्त्रोताविषयी समाधानकारक माहिती पुरवली नाही, तर तुमची चौकशी केली जाऊ शकते. या चौकशीत पकडले गेल्यास तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाईल. तसेच उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही, तर ठेव रकमेवर ६०% कर, २५% अधिभार आणि ४% उपकर आकारला जाऊ शकतो.
आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सर्वजण आपली कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी बचत खात्यात पैसे जमा करतो. अशा परिस्थितीत, बचत खात्यात कमाल जमा करायची मर्यादा निश्चित नाही परंतु, खात्यात जास्त पैसे ठेवले आणि स्रोत उघड केला नाही, तर प्राप्तिकर विभाग तुमची चौकशी करण्याची शक्यता असून स्रोत स्पष्ट असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.