‘जिल्ह्यात मी म्हणेल ते चालते’ ही भूमिका मोडून काढू
(political news) जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी म्हणून हसन मुश्रीफ यांची झोळी भरून फाटेल एवढे शिवसेनेने त्यांना दिले आहे. जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेने भरभरून दिलंय, असं मुश्रीफही मान्य करतात; मात्र आता ते आमचे हातही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचा फक्त वापरच करायचा, या त्यांच्या विचारामुळेच आम्हीही निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
तुरंबे (ता. राधानगरी) येथील गणेश मंदिर आवारात शिवसेना, शेकाप, आरपीआय व मित्रपक्षाच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी खा. मंडलिक बोलत होते. जिल्हा परिषद ते ‘गोकुळ’पासून सर्वच निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडी म्हणून सामंजस्याची भूमिका घेतली; पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला वापरण्याची सत्ताधार्यांची भूमिका स्पष्ट झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठीच समविचारी पक्षांबरोबर निवडणूक रिंगणात उतरल्याचे मंडलिक म्हणाले.
वयाच्या मानाने मुश्रीफ निर्णय घ्यायला कचरत आहेत ः आबिटकर
महाराष्ट्रात जसे महाविकास आघाडी सरकार आहे, याच पद्धतीने जिल्हा बँकेतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याची आमची भूमिका होती; मात्र हसन मुश्रीफ शिवसेनेचा फक्त वापरच करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही ही आघाडी स्थापन केली आहे. अलीकडच्या काळामध्ये मुश्रीफ वयाच्या मानाने निर्णय घ्यायला कचरत असल्याचाही आरोप आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला. शाहू कारखाना बिनविरोध, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते बिनविरोध कसे, असा सवाल करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून स्वार्थासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला जवळ केल्याचा आरोप केला. (political news)
सत्ताधार्यांकडून मतदारांना आमिषे
विरोधक मतदारांना आमिषे दाखवत असल्याचे राजेखान जमादार म्हणाले, तर ताकद असताना जिल्हा बँकेत शिवसेनेला डावलल्याचे कधीही सहन करणार नाही, असे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले. संजय मंडलिकांना अनेक ऑफर आल्या; पण त्यांनी त्या धुडकावून लावल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एका महाशयांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून केलेला घोडेबाजार मान्य केला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोक्याचं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहा, असे आवाहन माजी आमदार सत्यजितपाटील यांनी केले.
शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील व डॉ. सुजित मिणचेकर, रिपब्लिकन पार्टीचे प्रा. शहाजी कांबळे, सहकार सेनेचे प्रदीप खोपडे यांचीही भाषणे झाली. उमेदवार अर्जुन आबिटकर, क्रांतिसिंह पवार – पाटील, उत्तम कांबळे, रेखा कुराडे यांच्यासह हंबीरराव पाटील, सुरेश कुराडे, मुरलीधर जाधव, एकनाथ पाटील, वीरेंद्र मंडलिक, ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे, अरुण जाधव, सुरेश चौगले, विश्वास पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, नंदकुमार ढेंगे, बापूसाहेब भोसले, केरबाभाऊ पाटील, आबाजी पाटील, कल्याणराव निकम यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जिल्ह्यात मी म्हणेल ते चालते’ ही भूमिका मोडून काढू
महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रासारखे राजकारण कोल्हापूर जिल्ह्यात करूया, अशी आमची मागणी होती; मात्र विरोधी आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला अंधारात ठेवले. त्यामुळेच खासदार संजय मंडलिक यांनी पुढाकार घेऊन आमच्या पॅनेलची रचना केली. यानंतर जिल्ह्यात भूकंप झाला. काही प्रमुख नेत्यांना मी म्हणेल तसे जिल्ह्याचे राजकारण चालते, असे वाटते, मात्र ते आम्ही मोडून काढू. ‘अर्थ’कारणाला जिल्हा साथ देत नाही, हे निकालानंतर कळेल, असे आ. आबिटकर म्हणाले.