राऊतांनी गप्प बसावे, अन्यथा माझ्याकडे ‘चोपडी’ आहे

(political news) शिवसेनेच्या नेत्यांमध्ये घबराट आहे. त्यांच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या फाइल्स ईडीकडे तयार आहेत. त्यांच्यापेक्षा कितीतरी माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊत व शिवसेनेच्या नेत्यांनी गप्प बसावे, नाहीतर गुजराती भाषेत पुस्तकाला जशी चोपडी म्हणतात, तशी चोपडी माझ्याकडे आहे. मी जर ठरवले तर शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांचा चेहरा उघड करेल, असा इशाराच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला.

‘आयटी कॉन्क्लेव्ह 2022’च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेल्या ना. नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ना. राणे म्हणाले की, संजय राऊत ईडीकडे तक्रार करीत असतील तर ती चांगलीच सुरुवात म्हणावी लागेल. त्यांनी तक्रार केली की, आम्ही लगेच आमच्याकडील फाइल्स ईडीकडे जमा करतो. त्यांच्यापेक्षा माझ्याकडे बरीच माहिती आहे. छगन भुजबळांना अडीच वर्षे कारागृहात राहावे लागले, अगदी तशीच प्रकरणे शिवसेनेच्या अनेक नेत्यांची आहेत. त्यामुळे संजय राऊतांची तयारी असेल तर त्यांनी तसे सांगावे. राऊत यांच्या मुलींच्या नावावर असलेली मालमत्ता, जमिनीत केलेली गुंतवणूक, त्यातील पार्टनर अशा बर्‍याच बाबी संशयास्पद असल्याने त्यांनी काहीही बोलू नये. खरे तर राऊत हे शिवसेनेच्या हितासाठी काम करीत नाहीत, तर वरिष्ठांची खुर्ची कधी खाली होईल, या प्रयत्नात ते आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला त्यांना सांगितले की, तुम्ही तिकडून त्यांना खाली खेचा, आम्ही तुम्हाला लगेच त्या ठिकाणी बसवतो. राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने संजय राऊत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचा गौप्यस्फोटही ना. राणे यावेळी केला. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त अनुपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर ना. राणे यांना विचारले असता, राज्यात सर्वत्र अधिकार्‍यांना वेठीस धरणे व त्यांच्याकडून नियमबाह्य कामे करून घेण्याचे प्रकार राज्य सरकारकडून केले जात आहे. वाजे हे त्याचेच उदाहरण असून, अवघ्या नऊ दिवसांतच त्याला क्राइम ब्रँच मिळते व तो सुशांतसिंह, दिशा सालियन प्रकरणात हस्तक्षेप करायला लागतो, हे सर्व संशयास्पद असल्याचेही ना. राणे यांनी यावेळी सांगितले. (political news)

नाशिकमध्ये आयटी पार्क होणे राज्य व देशासाठी महत्त्वाचे असून, या पार्कच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळेल. पर्यायाने देशाच्या उत्पन्नात मोठी भर पडेल. निर्यात वाढेल, तसेच जीडीपीमध्ये वाढ होऊन आत्मनिर्भर भारतासाठी आयटी पार्क फायदेशीर ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *